महापालिकेचा भूखंड ‘सतारा प्लाझा’ला कोणी विकला?
नगरसेवक किशोर पाटकर यांची सखोल चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ५ ः पालिकेच्या मुख्यालयासाठी सिडकोकडून राखीव ठेवलेला भूखंड पुढे निविदा काढून खासगी बांधकाम व्यावसायिकाला ‘सतारा प्लाझा’ उभारण्यासाठी कसा व कोणी विकला, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला आहे. सत्ताधारी भाजपकडून विविध भूखंडांच्या चौकशीचा तगादा लावला जात असतानाच, पाटकर यांनी थेट ‘सतारा प्लाझा’च्या भूखंड व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी लावून धरल्याने भाजप नेत्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
मंगळवारी (ता. ३) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सहायक नगररचनाकारक सोमनाथ केकाण यांच्यावर भूखंड इतरांना विक्री केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. त्यामुळे अशा भूखंडांची चौकशी करण्याची मागणी सभागृह नेते सागर नाईक यांनी लावून धरली. तसेच सोमनाथ केकाण यांना निलंबित करण्याचा ठरावही बहूमताने भाजपने मंजूर केला. या प्रकरणावर बोलताना पाटकर यांनी पूर्वीच्या भूखंड घोटाळ्याचे आरोप सत्ताधाऱ्यांवर केले. सिडकोने मूळतः नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयाची इमारत उभारण्यासाठी एका भूखंडाचे वाटप केले होते, मात्र पालिकेचे मुख्यालय तिथे उभारण्याऐवजी तो भूखंड निविदा प्रक्रियेद्वारे १७ प्लाझा / १७ बिल्डरला (सतारा प्लाझा) कसा आणि कोणत्या नियमांखाली विकला गेला, यावर किशोर पाटकर यांनी बोट ठेवले आहे.
हा प्रशासकीय दुटप्पीपणा!
१ पाटकर म्हणाले की, इतक्या मोठा भूखंड विक्रीचा गैरव्यवहाराचा विषय सोडून द्यायचा आणि लहान-सहान गोष्टींवर कारवाई करत बसायचे, ही सत्ताधाऱ्यांची वृत्ती संशयास्पद आहे. ज्या प्रकरणांमध्ये आधीच क्लीन चिट मिळालेली आहे, अशा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे, परंतु क्लीन चिट देणाऱ्या अहवालावर स्वाक्षरी करणाऱ्या आयुक्तांवर कारवाई का केली जात नाही, असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला.
२ काही अधिकाऱ्यांना सोडून द्यायचे आणि इतरांना जाळ्यात पकडायचे, हा प्रशासकीय दुटप्पीपणा आहे. महापालिकेत व प्रशासनात नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. त्यामुळे या संपूर्ण भूखंड विक्री प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर संतुलित व कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका पाटकर यांनी मांडली.
सागर नाईक यांचे प्रत्युत्तर
किशोर पाटकर यांच्या या आक्रमक पवित्र्यावर सागर नाईक यांनी प्रत्युत्तर दिले. त्या वेळी तुम्हीदेखील आमच्या पक्षात सभागृहात होता. तेव्हा हा प्रश्न का उपस्थित केला नाही, असे त्यांनी म्हटले आहे, मात्र पाटकर यांच्या प्रश्नामुळे पुन्हा एकदा जुनी प्रकरणे उकरून काढण्याचे सत्र सुरू होतेय की काय, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.