फटाके फोडण्याबाबत
कालमर्यादेचा विचार करा!
उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरील बंदी कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेचे नियम राज्यातही लागू करण्याबाबत विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.
न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने १३ पानी आदेशात सर्वोच्च न्यायालयाच्या २९ ऑक्टोबरच्या आदेशाचा संदर्भ दिला. दिल्ली परिसरात केवळ हरित फटाके फोडण्यास सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेत परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातही अशा नियमांचा विचार करण्याची सूचना न्यायालयाने केली. अनियंत्रित आतषबाजीमुळे हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) अचानक वाढ होते. सूक्ष्म प्रदूषक वातावरणात अनेक दिवस टिकून राहतात. त्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले; मात्र दिवाळी याच आठवड्यात असल्याने यंदा तातडीने या नियमांची अंमलबजावणी करणे शक्य नसल्याचे सरकारने न्यायालयाला सांगितले.
धर्मनिरपेक्षतेचे पालन बंधनकारक
अभिनेत्री दिया मिर्झाच्या पर्यावरणपूरक दिवाळीच्या संदेशाचा व्हिडिओ महापालिकेने समाज माध्यमांवरून हटवल्याची न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली होती. हा व्हिडिओ पुन्हा प्रसारित करण्याचे आदेश दिले होते. काही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया निराधार असून त्या धर्मनिरपेक्षतेच्या घटनात्मक तत्त्वांच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने म्हटले. प्रत्येक नागरिकाने धर्मनिरपेक्षतेचे पालन करणे बंधनकारक आहे. प्रत्येक अधिकृत कृतीतून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि परस्पर आदर वाढला पाहिजे. कोणताही सण साजरा करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचेही न्यायालयाने आदेशात अधोरेखित केले.