दिवाळीपूर्वीच पाणीटंचाईचा विळखा
सागपाणी-रिठीपाड्यात टँकरची मागणी; जलजीवनचे काम अपूर्ण
जव्हार, ता. ५ (बातमीदार) : उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई यंदा दिवाळीपूर्वीच सागपाणी व रिठीपाडा या अतिदुर्गम गावांना भेडसावू लागली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू झाली असून, महिलांना हंडाभर पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत वावर-वांगणीने प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. दोन्ही गावांतील पाणीसाठे झपाट्याने आटल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. पाण्यासाठी महिलांना घरातील कामे बाजूला ठेवून भटकंती करावी लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायतीने २ नोव्हेंबर रोजी संबंधित विभागाला लेखी निवेदन दिले आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
जलजीवन मिशनचे काम रखडले
जलजीवन मिशनअंतर्गत दोन्ही गावांतील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असते, तर आज पाणीटंचाईची वेळ आली नसती. संबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे काम अपूर्ण राहिल्याचा आरोप सरपंच विनोद बुधर यांनी केला. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रखडलेले काम पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, दिवाळीपूर्वीच पाणीटंचाई निर्माण झाल्याने आगामी उन्हाळ्यात संकट अधिक गडद होण्याची भीती आहे. त्यामुळे तातडीने टँकर सुरू करण्यासह जलजीवन मिशनचे काम पूर्ण करून दोन्ही गावे कायमस्वरूपी टँकरमुक्त करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
‘‘हंडाभर पाण्यासाठी महिलांना रात्रीपासून प्रतीक्षा करावी लागते. घरातील शेतीची आणि इतर कामे बाजूला ठेवून संपूर्ण दिवस पाण्याच्या शोधात घालवावा लागतो. महिलांची ही फरपट थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करावेत आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.’’
- कौशल्या जाबर, ग्रामस्थ, सागपाणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.