बस थांबेच रेलिंगमध्ये बंदिस्त!
फॉर्म्युला चार रेसच्या तयारीचा प्रवाशांना फटका
बेलापूर, ता. ५ (बातमीदार) : नवी मुंबईत ५ आणि ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या फॉर्म्युला चार रेसच्या अंतिम सामन्याच्या तयारीने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पाम बीच मार्गासह विविध ठिकाणी सिमेंट रेलिंग आणि संरक्षक जाळ्या उभारण्यात येत आहेत, मात्र या कामांचा फटका आता थेट सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसू लागला आहे. सेक्टर २८ मधील संजय जोशी चौक आणि दारावे बस थांब्यासमोरच सिमेंट रेलिंग व जाळ्या उभारण्यात आल्याने बस थांबे अक्षरशः बंदिस्त झाले आहेत. परिणामी, प्रवाशांना बसची प्रतीक्षा करण्यासाठी चिंचोळ्या रस्त्यावर उभे राहावे लागत असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
फॉर्म्युला चार रेसच्या पार्श्वभूमीवर पाम बीच मार्गावर बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट रेलिंग उभारून त्यावर जाळ्या लावण्यात येत आहेत. तसेच ज्वेल ऑफ नवी मुंबई उद्यान परिसरातील रस्त्यावर प्रेक्षकांसाठी छोटे पूल उभारण्यात आले आहेत. स्पर्धेच्या आयोजनासाठी सुरू असलेल्या या कामांमुळे आधीच रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यात सेक्टर २८ मधील बस थांब्यांसमोरच रेलिंग लावल्याने प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागाच उरलेली नाही. बस पकडताना रस्त्यावर जावे लागत असून, बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून फॉर्म्युला रेसच्या तयारीसाठी शहरात विविध कामे सुरू आहेत. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली. त्यानंतर अनेक रस्त्यांवर सिमेंट रेलिंग आणि जाळ्या उभारल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. नेरूळ परिसर आणि पाम बीच मार्गावरील या कामांमुळे वाहतुकीवर परिणाम होत असून, नागरिकांना रोजच्या प्रवासात अडचणी सहन कराव्या लागत आहेत. काही ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे अपघातांच्याही घटना घडल्या आहेत. आता बस थांबेच अडथळ्यांच्या विळख्यात सापडल्याने सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या नागरिकांची गैरसोय वाढली आहे.
स्पर्धेच्या आयोजनातून शहराची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्यासाठी सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. बस थांब्यांसमोरील रेलिंग तातडीने हटवून प्रवाशांसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
नागरिकांच्या प्रतिक्रिया
गेल्या सहा महिन्यांपासून फॉर्म्युला रेसच्या कामांमुळे नेरूळ परिसर आणि पाम बीच मार्गाची दुरवस्था झाली आहे. आता बस थांब्यांसमोरही रेलिंग लावल्याने बस पकडण्यासाठी रस्त्यावर उतरून कसरत करावी लागत आहे.
- अभिषेक घाडगे, रहिवासी
फॉर्म्युला चार रेसच्या आयोजनामुळे शहराचे नाव मोठे होत आहे, मात्र या आयोजनामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठीही महापालिकेने आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- विवेक टाव्हरे, रहिवासी
बस थांब्यांसमोरील रेलिंग प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हटवून अन्यत्र लावण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर न उतरता बस थांब्यावरून सुरक्षितपणे प्रवास करता येईल. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.
- सुजाता पाटील, महापौर, नवी मुंबई महापालिका