काँक्रीट रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
खोदाई कमी केल्याने टिकाऊपणाबाबत शंका; दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीची भीती
अलिबाग, ता. ५ (वार्ताहर) : अलिबाग-रोहा मार्गावरील कुरूळ तलाव ते बेलकडे फाट्यापर्यंत सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वीच्या कामात दीड ते दोन फूट खोदाई केली जात होती, मात्र सध्या कमी खोलीकरण केले जात असल्याने रस्ता पुन्हा खचण्याची आणि खड्डे पडण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे, ऐन दिवाळीत सुरू असलेल्या कामामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या वर्षभरापासून तालुक्यात विविध ठिकाणी काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. अलिबाग-रोहा मार्गावरील बेलकडे ते सहाणपर्यंतचा रस्ता एमएसआयडीसीने बांधला होता, मात्र काम पूर्ण होण्यापूर्वीच त्यावर मोठे खड्डे पडल्याने रस्ता फोडून पुन्हा बांधण्याची वेळ आली. आता उर्वरित कुरूळ तलाव ते बेलकडे फाटा या मार्गाचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. खोदाईनंतर खडीकरण केले जात असले तरी त्याची खोली कमी असल्याने टिकाऊपणाबाबत शंका व्यक्त होत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावी येणाऱ्या नागरिकांची आणि खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या कामाच्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सुट्टीच्या काळात पर्यटकांचीही मोठी वाहतूक होणार असल्याने कोंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
पाच वर्षांची देखभाल ठेकेदाराकडे
एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलकडे ते कुरूळ हा मार्ग अरुंद असून, वाहनांची वर्दळ मोठी आहे. अधिक खोदाई केल्यास कामाला विलंब होऊन नागरिकांना जास्त दिवस कोंडीचा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे खोदाई कमी करण्यात आली आहे, मात्र सर्वेक्षणानुसारच काम सुरू असून, पुढील पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.