नगरविकासचा भाजपला दुसरा दणका!
नवी मुंबई महापालिकेतील सोमनाथ केकाण यांच्यावरील कारवाई रद्द
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ५ : नवी मुंबई महापालिकेत १० महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत आणि प्रशासकीय सूडनाट्यात अखेर नगरविकास विभागाने भाजप सत्ताधाऱ्यांना कायदेशीर व राजकीय दणका दिला आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांच्यावर चुकीच्या पद्धतीने बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र दिल्याचा ठपका ठेवून सत्ताधाऱ्यांनी सूडबुद्धीने केलेली निलंबनाची कारवाई नगरविकास विभागाने तत्काळ प्रभावाने रद्द केली आहे. उच्चस्तरीय चौकशी समितीने केकाण यांना सर्व आरोपांतून निर्दोष सिद्ध करूनही केवळ राजकीय अहंकारापोटी भाजप सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या विरोधात सलग दुसऱ्यांदा कारवाईचा ठराव संमत केला होता, मात्र नगरविकास विभागाने ठराव उडवून लावत भाजपची राजकीय खेळी उधळून लावली आहे.
वाशी, सेक्टर-९ येथील नैवेद्य व अलबेला सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास परवानग्या आणि भोगवटा प्रमाणपत्रांवरून महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि विरोधक असा मोठा संघर्ष पेटला होता. भाजप सदस्यांनी तत्कालीन सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल करून अनियमित परवानग्या दिल्याचा आरोप करत २२ जुलैला महासभेत ठराव संमत केला व त्यांना मूळ संवर्गात परत पाठवून शिस्तभंगविषयक कारवाईची मागणी केली होती. या ठरावाच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक आणि नगररचना सह-संचालक विजयकुमार वाघमोडे यांची दोन सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती गठित केली होती.
या चौकशी समितीने १६ सप्टेंबरला सादर केलेल्या अहवालात तत्कालीन विकास नियंत्रण नियमावली, एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, उपलब्ध अभिलेख आणि कायदेशीर अभिप्रायांची सखोल छाननी केली. समितीने आपल्या अहवालात स्पष्टपणे नोंदवले की, वाशी येथील नैवेद्य आणि अलबेला इमारतींना बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र देताना नगररचना विभागाकडून किंवा सोमनाथ केकाण यांच्याकडून कोणतीही तांत्रिक वा कायदेशीर अनियमितता झालेली नाही. या अहवालाद्वारे केकाण यांना पूर्णपणे क्लीन चिट मिळाली असतानाही, सत्ताधारी भाजपने राजकीय दबावापोटी महासभेत पुन्हा निलंबनाचा खेळ सुरू ठेवला होता.
राजकीय सूडबुद्धीचा पर्दाफाश
या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी भाजप सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषतः स्थानिक भाजप नेतृत्वावर अत्यंत तीव्र शब्दांत राजकीय सूडबुद्धीचा आरोप केला आहे. पाटकर यांनी जाहीरपणे आरोप केला की, सत्ताधारी लोकप्रतिनिधी नियमबाह्य आणि बेकायदा ठराव मंजूर करून प्रामाणिक अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान रचत आहेत. वाशीतील इमारती पाडण्याचे राजकीय आदेश भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने दिले होते, परंतु कायदेशीर चौकशीत अधिकाऱ्याचा कोणताही दोष आढळला नाही.
प्रशासकीय खेळ आणि खुंटलेला नागरी विकास
सत्ताधाऱ्यांच्या या राजकीय खेळीमुळे १० महिन्यांपासून नवी मुंबई महापालिकेचे संपूर्ण प्रशासन ठप्प झाले आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर राजकीय सूडबुद्धीने चौकशी व निलंबनाची कारवाई करण्याचे सत्र चालवल्यामुळे महापालिकेतील अन्य अधिकारी आणि कर्मचारी दहशतीखाली आले आहेत. त्यामुळे शहरातील अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प, रस्त्यांची कामे, उद्यानांचे सुशोभीकरण, आणि पुनर्विकासाच्या शेकडो फायली धुळ खात पडून आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.