आदिवासी मुलांसाठी प्रेमाची दिवाळी
५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उपक्रमात सहभाग; जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता वंचित घटकांतील मुलांच्या आयुष्यातही आनंदाचे रंग भरावेत, या उद्देशाने जाणीव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पालघर जिल्ह्यातील कणेर येथील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत ‘प्रेमाची दिवाळी २०२६’ हा उपक्रम राबवण्यात आला.
३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा, कणेर येथे झालेल्या या उपक्रमात ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिवाळीचा आनंद, कला-संस्कृतीची ओळख, ऐतिहासिक वारशाचे महत्त्व आणि आरोग्य व स्वच्छतेचे धडे अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांची दिवाळी आनंददायी करण्यात आली.
उपक्रमाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, पणत्या रंगवणे आणि ऐतिहासिक गडकिल्ले तयार करण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आकर्षक रांगोळ्या आणि रंगीबेरंगी पणत्या साकारल्या. मातीपासून गडकिल्ले तयार करताना त्यांना ऐतिहासिक वास्तू, स्वराज्याचा पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यशाली इतिहासाची ओळख करून देण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यातील सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत शाळेत उपस्थिती लावली. सामूहिक परिपाठानंतर स्वयंसेवक प्राजक्ता लाडी यांनी विद्यार्थ्यांना योगासने शिकवून शारीरिक आरोग्य आणि नियमित व्यायामाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर सामाजिक संदेश देणारी गाणी, कविता आणि आदिवासी तारपा नृत्याचे सादरीकरण झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या तारपा नृत्याने कार्यक्रमात विशेष रंग भरला.
शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त रामचंद्र परब, सुनील पाठक व अजित सातोसे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
दिवाळी फराळाचे वाटप
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रांगोळ्या, पणत्या आणि गडकिल्ल्यांचे प्रदर्शन पालक व ग्रामस्थांसाठी खुले करण्यात आले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वच्छताविषयक साहित्य संचही देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.