नवी मुंबई-पनवेलकरांचा श्वास गुदमरतोय
प्रदूषणाचा विळखा घट्ट; एमपीसीबीच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ : नवी मुंबई आणि पनवेल पालिका क्षेत्रातील १८ नोड्समध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांच्या फुप्फुसांत विषारी हवा जात असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सुस्त असल्याचे चित्र आहे. दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, महापे, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, बेलापूर या नागरी पट्ट्यांपासून ते तळोजा, कळंबोली, खारघर, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल शहर आणि खांदा कॉलनीपर्यंतच्या संपूर्ण भागात हिवाळ्याच्या आगमनासोबतच हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने ढासळत आहे. ६ नोव्हेंबरला सकाळी वाशी आणि महापे परिसरात एक्यूआय थेट १६२ खराब श्रेणीत नोंदवला गेला, तर हवेतील पीएम २.५चे प्रमाण सुरक्षित मानकांपासून अनेक पटींनी जास्त होते. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे एमपीसीबीने पूर्णपणे दुर्लक्ष करीत महापालिकांवर कारवाईची जबाबदारी ढकललेली आहे. याप्रकरणी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
वायू (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ अंतर्गत हवेचे प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे, उत्पादन बंद करण्याचे आणि परवाने रद्द करण्याचे मुख्य कायदेशीर अधिकार एमपीसीबीकडे आहेत. परंतु, प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी एमपीसीबीने सर्व जबाबदारी नवी मुंबई आणि पनवेल महापालिकांच्या मानगुटीवर बसवून स्वतःचे हात वर केले आहेत. तळोजा एमआयडीसी आणि ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातून रात्रीच्या वेळी सोडला जाणारा रासायनिक धूर, सायन-पनवेल महामार्ग व जेएनपीटी कॉरिडॉरवरून धावणाऱ्या हजारो अवजड डिझेल वाहनांचे उत्सर्जन यांवर कारवाई कोण करणार, असा रोखठोक सवाल नागरिक विचारत आहेत. गेले आठवडाभरातील वातावरणीय बदलानुसार तळोजा, खारघर आणि पनवेल भागात दररोज पहाटे ६ ते सकाळी ९ या वेळेत सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण भारतीय मानकांपेक्षा २ ते ५ पटीने जास्त नोंदवले जात आहे. तापमान रोधामुळे रात्रभर साचलेले प्रदूषक घटक जमिनीलगतच रेंगाळतात, ज्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी ही हवा घातक ठरत आहे. एमपीसीबी केवळ काही बांधकाम साइट्स किंवा आरएमसी प्लँट्सना नोटिसा बजावून कागदी घोडे नाचवत आहे. प्रत्यक्षात मात्र हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणतीही ठोस जमिनीवरची कारवाई दिसत नाही.
दिवाळीत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती
येत्या काही दिवसांत दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आतषबाजीमुळे वातावरणात बायरियम नायट्रेट, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडचे विषारी कण प्रचंड प्रमाणात साचणार आहेत. एमपीसीबीच्या स्वतःच्या अंदाजानुसार, दिवाळीच्या रात्री आणि त्यानंतरच्या दिवसांत एक्यूआय १५० ते २५० पार जाऊन हवा अत्यंत खराब श्रेणीत पोहोचण्याचा धोका आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निर्देशांनंतरही बेकायदा रासायनिक फटाक्यांच्या विक्रीवर आणि वेळेच्या उल्लंघनावर एमपीसीबीची कोणतीही सक्षम दक्षता यंत्रणा कार्यरत नाही.
कोर्टाच्या चाबकाची वाट पाहणार का?
दरवर्षी हिवाळा आला की एमपीसीबी फक्त सरकारी पोर्टल्सवर आकडेवारी अपडेट करण्यापलीकडे काहीही करीत नाही. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरच या अधिकाऱ्यांना जाग येणार का, असा जळजळीत प्रश्न नवी मुंबई व पनवेलमधील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. दिवाळीच्या तोंडावर जर एमपीसीबीने औद्योगिक प्रदूषण, बांधकामांची धूळ आणि नियमबाह्य फटाक्यांवर २४ तास कडक कारवाई केली नाही, तर या संपूर्ण परिसराला गॅस चेंबर बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.