ग्रामीण भागातील महिलांचा नवा अध्याय
‘उमेद’च्या माध्यमातून १० लाख महिला बचत गटांशी जोडल्या
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ ः महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्यासाठी ‘उमेद’-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने एक अत्यंत प्रेरणादायी आणि ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागातील १० लाखांहून अधिक महिलांना बचत गटांच्या चळवळीत समाविष्ट करून आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा दाखवण्यात आली आहे.
अभियानाच्या कालावधीत ‘उमेद’ यंत्रणेने अहोरात्र मेहनत घेत राज्यात एक लाख तीन हजार २०९ नवीन महिला बचत गटांची स्थापना केली आहे. यापैकी ७८ हजार ४५४ बचत गटांची नोंदणी ‘लोकओएस’ या डिजिटल प्रणालीवर यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, उर्वरित गटांची नोंदणी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत एक लाख पाच हजार ३७१ बचत गटांच्या स्थापनेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. उमेद यंत्रणेने आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर या उद्दिष्टाच्या अगदी समीप पोहोचत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. नियमित कामकाजासह सेवा संकल्प अभियानाच्या कालावधीत देशात सर्वात जास्त बचत गटांची स्थापना करून महाराष्ट्राने संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्य स्तरापासून ते थेट गावस्तरापर्यंत उमेद अभियानाची संपूर्ण यंत्रणा एकसंध होऊन कामाला लागल्याचे हे फलित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सहा कोटी ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे स्वप्न पाहिले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एक कोटी लखपती दीदी घडवण्याचा खंबीर संकल्प केला आहे. हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभाग सचिव चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संपूर्ण ग्रामविकास विभाग पूर्ण ताकदीने कार्यरत आहे.
‘‘सेवा संकल्प अभियानातील या व्यापक कामामुळे राज्यातील बचत गटांची चळवळ अधिक समृद्ध आणि बळकट होण्यास मोठी मदत होणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी उमेद अभियान यापुढेही अशीच भरीव कामगिरी करत राहील.’’
- श्रीधर डुबे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.