बेकायदा अटकेमुळे दोघांची सुटका
क्रिप्टोकरन्सी फसवणुकीप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : क्रिप्टोकरन्सी (कूटचलन) फसवणूकप्रकरणी छत्तीसगडमधील दोन व्यक्तींची अटक बेकायदेशीर ठरवून त्यांना मुक्त करण्याचे आदेश महानगरदंडाधिकाऱ्यांनी नुकतेच दिले. पोलिसांनी अनिवार्य प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे ही अटक बेकायदा असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
तपास यंत्रणेकडून झालेल्या त्रुटींबाबत माहिती मिळावी आणि आवश्यक ती कारवाई करण्याच्या उद्देशाने आदेशाची प्रत संबंधित पोलिस उपायुक्तांकडे (डीसीपी) पाठवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. या दोघांना मुक्त करण्याचे आदेश देताना, त्यांची अटक अत्यंत आवश्यक असेलच, तर पोलिस कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून पुढील कारवाई करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या अटकेनंतर, आरोपी वेदप्रकाश कुंजालाल साहू (३३) आणि दौलत सिंग दुलारदास साहू (४५) यांना २ नोव्हेंबरला कुर्लास्थित प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एम. गौरगोंड यांच्यासमोर हजर केले होते. पोलिसांनी त्यांना १० दिवस कोठडी देण्याची मागणी केली होती. पोलिसांच्या आरोपांनुसार, हे दोघे आणि इतर फरार आरोपी ‘फ्लो एक्स प्रोटोकॉल प्रायव्हेट लिमिटेड’ नावाच्या कंपनीचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी कुर्लातील एका ३० वर्षांच्या स्टॉक आणि क्रिप्टोकरन्सी व्यापाऱ्याला ‘युएसडीटी’मध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून त्याला दरमहा ४५ टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराला बनावट नोंदणी कागदपत्रे, तसेच भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि भारतीय रोखे व विनिमय मंडळ (सेबी) यांची बनावट प्रमाणपत्रे दाखवली, या माध्यमातून त्यांनी या वर्षी फेब्रुवारी ते ऑगस्टदरम्यान ७.५० लाख रुपये रोख स्वरूपात उकळले.
गुन्हा दाखल
तक्रारदाराला ठरल्याप्रमाणे परतावा मिळाला नाही आणि त्याची मूळ गुंतवणूकही परत मिळाली नाही, तेव्हा त्याने कुर्ला पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर, भारतीय न्याय संहितेच्या फसवणूक, ओळख लपवून फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींना गोव्यातून ताब्यात घेण्यात आले.