वीस दिवसांच्या बाळाचा
अडीच लाखांना सौदा
मुंब्रा येथील प्रकार; २४ तासांत होमगार्डसह १० आरोपींना अटक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : मुंब्र्यात अवघ्या २० दिवसांच्या बाळाची अडीच लाख रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाळाच्या विक्रीसाठी आईवर दबाव आणण्यात आला. तसेच हा प्रकार उघड होऊ नये म्हणून आई आणि तिच्या बहिणीला मारहाण करून त्यांच्याकडील पैसेही जबरदस्तीने काढून घेण्यात आले. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत रत्नागिरीतून बाळाची सुखरूप सुटका करीत होमगार्डसह १० आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती ठाणे शहर परिमंडळ-१चे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी दिली.
कळवा येथील शांतीनगर परिसरात राहणारी १९ वर्षीय अनिसा शेख ही मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करते. मुंब्रा येथील रेहान शेख याने तिच्या बाळाच्या विक्रीसाठी दबाव आणला. त्यानंतर बाळाची अडीच लाख रुपयांना विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार लपवण्यासाठी अनिसाला एक लाख २० हजार रुपये देण्याचा बनाव करण्यात आला. मात्र नंतर अनिसा आणि तिची बहीण अलकीशा यांना वायरने मारहाण करून ही रक्कम काढून घेण्यात आली. याप्रकरणी ५ नोव्हेंबरला मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी पाच स्वतंत्र पथके तयार केली. तांत्रिक तपासाच्या आधारे ५ नोव्हेंबरला ज्योती पाटील (३५), रेहान शेख (२२), फरहान शेख (२१), फरिदा सय्यद (५२) आणि हुस्ना शेख (२७) यांना मुंब्र्यातून अटक केली. ६ नोव्हेंबरला अनिता धोत्रे (४२) आणि सुनीता खैरनार (३०) यांना अनुक्रमे दिवा आणि कल्याण येथून ताब्यात घेतले. गोपीनाथ धोत्रे (४६) या होमगार्डला जालना येथून, प्रतिभा परब (४६) हिला डोंबिवलीतून, तर शिल्पा साठे (३४) हिला दिव्यातून अटक करण्यात आली. १० आरोपींना १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी महिला पोलिस निरीक्षक वृषाली पवार तपास करीत आहेत
बाळ डोंबिवलीतील संस्थेकडे सुखरूप
रत्नागिरी येथून पोलिसांनी बाळाला सुखरूप ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनानुसार त्याला डोंबिवलीतील ‘जननी आशीष संस्था’ येथे ठेवण्यात आले आहे. पुढील व्यवस्था समितीच्या आदेशानुसार केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.