५१ तांत्रिक विद्यालयांचे नामांतर!
कौशल्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती
मुंबई, ता. ७ : राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराची प्रक्रिया पुढे सरकली असून, कोकण आणि नाशिक विभाग वगळता अन्य विभागांतील आणखी ५१ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास शासनाने मान्यता दिली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील तांत्रिक विद्यालयांना नवीन नावे मिळणार आहेत. या नावांमध्ये विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते, विशिष्ट विचारांना वाहिलेले समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी आदींचा समावेश आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या शासन निर्णयानुसार कौशल्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला शासकीय तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात कोकण आणि नाशिक विभागातील २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास २१ ऑक्टोबर २०२६ला शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली होती. आता या दोन विभागांव्यतिरिक्त राज्यातील अन्य विभागांमधील ५१ विद्यालयांच्या नामांतरास मंजुरी देण्यात आली आहे. नवीन निर्णयानुसार यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक पाच शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि वर्धा जिल्ह्यांतील प्रत्येकी चार विद्यालयांचा समावेश आहे. नांदेड, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन विद्यालयांची नावे बदलण्यात येणार आहेत. पुणे, सातारा, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, वाशिम, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन विद्यालयांचे नामांतर करण्यात येणार आहे. तर सांगली, सोलापूर, लातूर, बुलढाणा आणि भंडारा या जिल्ह्यांतील प्रत्येकी एका विद्यालयाचे नाव बदलण्यात येणार आहे.
रोजगाराभिमुख कौशल्यांचा विकास
माध्यमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची ओळख व्हावी, त्यांच्यामध्ये कौशल्याधारित शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि रोजगाराभिमुख कौशल्यांचा विकास व्हावा, हा या अभ्यासक्रमांचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराच्या निर्णयामुळे या संस्थांना नवी ओळख मिळणार असून, नामांतराची ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.