डोंगरावरील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे हटविण्याची मागणी
घाटकोपर, ता. ८ : लालबत्ती हनुमान टेकडी परिसरातील आझादनगरच्या वरच्या बाजूला असलेल्या मोकळ्या डोंगराळ भागात शनिवारी अचानक आग लागली. वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण डोंगर परिसरात वेगाने फैलाव केला. या घटनेमुळे परिसरातील अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी संबंधित लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दल आणि मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच परिसरातील कचरा हटविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आझादनगर परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी झालेल्या कथित अनधिकृत बांधकामांमुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले. डोंगराळ भागात अग्निशमन दलाची वाहने पोहोचणे आधीच कठीण असताना रस्त्यावरील अडथळ्यांमुळे आग वेळेत आटोक्यात आणण्याचे आव्हान अधिक वाढले.
या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका सभेत हा प्रश्न ठामपणे उपस्थित करून प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी करणार असल्याचे नगरसेवक किरण लांडगे यांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे संबंधित विभागांच्या संयुक्त कारवाईतून हटवून रस्ते मोकळे करण्याची मागणीही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अग्निशमन दलाची वाहने पोहोचू शकत नसलेल्या डोंगराळ भागांमध्ये विशेष जलवाहिनी आणि हायड्रंट यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात आगीची घटना घडल्यास तातडीने पाण्याचा पुरवठा करून आग नियंत्रणात आणणे शक्य होईल.
डोंगराळ भागांमध्ये विशेष जलवाहिनी आणि हायड्रंट यंत्रणा उभारण्याची गरज आहे. त्यामुळे भविष्यात आगीची घटना घडल्यास तातडीने पाण्याचा पुरवठा करून आग नियंत्रणात आणणे शक्य होईल. त्यासाठी महापालिकेत विशेष पाठपुरावा करणार आहे.
– किरण लांडगे, नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.