आदिवासी बांधवांसोबत लोढा यांची दिवाळी
खांबांचा पाड्यात मुलांना शैक्षणिक साहित्य, खेळणी, सायकलींचे वाटप
मुंबई, ता. ८ : राज्यात दुष्काळ असल्याने शेतकरी आणि आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गोरेगाव पूर्वेच्या खांबांचा पाडा येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.
या वेळी त्यांनी लहान मुलांना शैक्षणिक साहित्य, खेळणी, सजावट साहित्य, बिस्किटे आणि सायकलींचे वाटप करून त्यांच्या आनंदात भर घातली. वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र आणि लोढा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री लोढा यांनी आदिवासी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभाग घेतला.
या उपक्रमांतर्गत लोढा फाउंडेशनच्या माध्यमातून दुरुस्ती करून वापरण्यायोग्य बनवलेल्या सायकली आणि खेळण्यांचे गरजू मुलांना वाटप करण्यात आले. या वेळी लोढा म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदाची दिवाळी शेतकरी आणि आदिवासी बांधवांसोबत साजरी करण्याचे आवाहन केले आहे. आरे कॉलनी परिसरात एकूण २७ आदिवासी पाडे आहेत. राज्याचा मंत्री आणि मुंबई उपनगराचा सहपालकमंत्री म्हणून या भागातील नागरिकांना आवश्यक असलेली कोणतीही मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे.
शहरातील नागरिकांकडून वापरात नसलेल्या वस्तू जमा करून लोढा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांची दुरुस्ती केली जाते. त्यानंतर सायकली आणि खेळणी यांसारख्या वस्तू गरजू मुलांपर्यंत पोहोचवल्या जातात. यापुढे दरवर्षी वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनुभव आतापर्यंतच्या सर्वांत खास दिवाळीच्या आठवणींपैकी एक असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नगरसेविका प्रीती साटम, वनवासी कल्याण आश्रमचे कार्याध्यक्ष सुशील जाजू यांच्यासह अन्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. या वेळी लोढा यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना दिवाळी फराळाचे वाटप केले. भेटवस्तू आणि फराळामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.