सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील सांघवी हिल्स परिसरातील आरावली हिल्स सोसायटीच्या सातव्या मजल्यावरील कॉरिडॉरमध्ये रविवारी (ता. ८) मध्यरात्री आग लागली. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांसह चार जण जखमी झाले. तसेच आगीच्या धुरामुळे एका सदनिकेमध्ये अडकलेल्या दोघांची ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. या आगीत चार फ्लॅटचे मुख्य दरवाजे, विद्युत वायरिंग आणि लिफ्टचे नुकसान झाले. तसेच आगीवर पूर्णपणे तब्बल तासाभराने नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
रविवारी मध्यरात्री १२.२० वाजण्याच्या सुमारास आरावली हिल्स सोसायटीच्या ए विंगमधील सातव्या मजल्यावरील कॉरिडॉरमध्ये आग लागल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे दोन बंब आणि एक रेस्क्यू वाहन घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, आरोग्य विभागाची रुग्णवाहिका तसेच कासारवडवली पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मध्यरात्री १.१० वाजण्याच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेत महेश धस (वय ४६), रीना धस (४६) आणि वेदांत धस (१८) या एकाच कुटुंबातील तिघे किरकोळ भाजले. तर राजेंद्र जोशी (६७) हे खाली उतरताना जखमी झाले. चौघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही, अशी माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी यासिन तडवी यांनी सांगितले.
दोघांची अग्निशमनकडून सुटका
आगीच्या वेळी सातव्या मजल्यावरील ७०१ क्रमांकाच्या सदनिकेत शाहिद आनंद (३२) आणि स्वामिनी पराडकर (३५) हे दोघे अडकले होते. त्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित सुटका केली. आगीमुळे सातव्या मजल्यावरील ७०१ ते ७०४ क्रमांकाच्या सदनिकांचे मुख्य दरवाजे आणि विद्युत वायरिंग जळाले. तसेच इमारतीतील लिफ्टचेही नुकसान झाले.