सेवा रस्त्यांवर खासगी वाहनांचे अतिक्रमण
एसटी बसच्या येण्या-जाण्याचा मार्ग अडला; अपघाताचा धोका वाढला
पोलादपूर, ता. ८ (बातमीदार) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ लगत असलेल्या पोलादपूर शहरातील सर्व्हिस रोडवर अनधिकृत पार्किंग आणि खासगी वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. बस स्थानकासमोरील पुलावर खासगी वाहनांचे पार्किंग आणि खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांमुळे एसटी बसेसना वळण घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. अरुंद जागेतून बस बाहेर काढताना चालकांना अडचणी येत असून, या परिस्थितीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
पोलादपूर शहरातील सर्व्हिस रोडलगत सरकारी रुग्णालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच काळभैरवनाथ मंदिर असल्याने या परिसरात दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. त्यातच खासगी ट्रॅव्हल्सच्या बसांची रांग आणि बेशिस्त पार्किंगमुळे दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरातील अंडरपास मार्गिकेवर पाच समांतर पूल जोडण्यात आले आहेत. या पुलांवर खासगी वाहनांचे पार्किंग आणि खाद्यपदार्थांच्या टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. विशेषतः बसस्थानकासमोरील पुलावर वाहनांची गर्दी असल्याने कोकणातून येणाऱ्या तसेच बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी बसेसना वळण घेणे कठीण होत आहे. महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या आणि खासगी ट्रॅव्हल्सची वर्दळ यामुळे वाहतुकीचा ताण वाढला आहे.
खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी व्यवसायासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करावी. सार्वजनिक रस्त्याचा वापर खासगी वाहनांच्या पार्किंगसाठी होऊ नये, अशी भूमिका नागरिकांकडून मांडली जात आहे.
या समस्येबाबत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यापूर्वी प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत, मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
अपघाताआधी उपाययोजना करा
सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंग हटवून पुलांवरील वाहने बाजूला करणे, खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांचे योग्य नियोजन करणे आणि एसटी बसला वळण घेण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. वाहतूक पोलिस, महामार्ग प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने समन्वय साधून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.
फोटो कॅप्शन : पोलादपूर बसस्थानकासमोरील पुलावर खासगी वाहनांच्या पार्किंगमुळे एसटी बसला वळण घेताना करावी लागणारी कसरत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.