सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ : ठाणे-बेलापूर महामार्गावरील तुर्भे स्टोअर येथील उड्डाणपुलाचे काम कंत्राटदाराच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांसाठी थेट मृत्यूचा सापळा ठरत आहे. अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेल्या या कामामुळे महामार्गावर भीषण अपघात होत आहेत. आतापर्यंत तब्बल ५० ते ६० निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या गंभीर प्रकारावर नवी मुंबई महापालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेत पालिका प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे.
कंत्राटदार आणि पालिका प्रशासनाच्या संगनमतामुळेच हे बळी गेल्याचा दावा करत, सदर कंत्राटदाराला तत्काळ काळ्या यादीत टाकावे व कंत्राट रद्द करून नवीन सक्षम कंपनीला हे काम द्यावे, अशी मागणी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. २०२२ या वर्षामध्ये आधीच काळ्या यादीत असलेल्या कंपनीला तुर्भे स्टोअर उड्डाणपुलाचे कंत्राट देण्यात आले होते. सुरुवातीला पुलाची डिझाइन अत्यंत चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आली होती. यामध्ये केवळ लहान वाहनांचा विचार केला गेला होता आणि डम्पर, ट्रेलर, बस व अग्निशमन दलासारख्या अवजड वाहनांची कोणतीही सोय नव्हती. या चुकीच्या डिझाइनमुळे स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवून काम बंद पाडले. त्यानंतर प्रशासनाची टाळाटाळ आणि खर्च वाढेल, अशी कारणे झुगारून देत नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नवीन डिझाइन आणि वाढीव निधी मंजूर करून घेतला, परंतु या संपूर्ण प्रक्रियेत सहा ते सात महिन्यांचा मोलाचा वेळ वाया गेला. नवीन डिझाइन मंजूर होऊनही कंत्राटदाराने गेल्या तीन वर्षांत एका-एका खांबाचे काम संथ गतीने करत केवळ चालढकल केली आहे.
अपघातांमुळे अनेकांचे संसार संकटात
कंत्राटदाराची अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि महापालिका प्रशासनाचे गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष यामुळे दररोज या महामार्गावर अपघात होत आहे. आतापर्यंत ५० ते ६० नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर २५ ते ३० नागरिक गंभीर जखमी झाले आहेत आणि काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.
रास्ता रोकोचा इशारा
कंत्राटदार कंपनीला तातडीने काळ्या यादीत टाकावे, सदर कंत्राट रद्द करून नवीन अनुभवी व सक्षम कंपनीला सोपवावे आणि तुर्भे स्टोअर उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली. प्रशासनाने यावर तत्काळ कारवाई न केल्यास आणि पुन्हा एखादा अपघात झाल्यास स्थानिक रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.