अटल सेतूच्या २४० कामगारांना दिवाळी भेट
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ : अटल सेतू टोलनाक्यावरील कामगारांना यंदा पहिल्यांदाच दिवाळी बोनस मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या २४० स्थानिक कामगारांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. कामगारांनी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर त्यांनी एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर ६ नोव्हेंबरला बोनसचे वाटप करण्यात आले.
अटल सेतू प्रकल्पावर स्थानिक २४० युवकांना रोजगार मिळाला होता, मात्र गेल्या तीन वर्षांपासून त्यांना दिवाळी बोनस दिला जात नव्हता. ठेकेदाराकडून कामगारांना त्रास दिला जात असल्याच्या तसेच काही कामगारांना कामावरून कमी केल्याच्या तक्रारीही होत्या. त्यामुळे कामगारांनी महेंद्र घरत यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर घरत यांनी मुंबईत एमएमआरडीए आयुक्तांची भेट घेऊन कामगारांचे प्रश्न मांडले. ठेकेदाराला बोनस देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर तसेच कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला.
दरम्यान, अटल सेतू प्रकल्पाच्या उभारणीच्या काळातही प्रकल्पबाधित शेतकरी आणि स्थानिकांच्या प्रश्नांसाठी घरत यांनी पाठपुरावा केला होता. गव्हाण, जासई, चिर्ले आणि न्हावा परिसरातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना साडेबावीस टक्के भूखंड, स्थानिकांना रोजगार आणि ग्रामपंचायतींना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. उरण-नेरूळ रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या साडेबावीस टक्के पॅकेजच्या मागणीसाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता.
पहिल्यांदाच बोनस मिळाल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी महेंद्र घरत यांची ‘सुखकर्ता’ येथे भेट घेऊन आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.