मृत जमीनमालकाच्या नावावर व्यवहार
मुंब्र्यातील प्रकरणात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : मूळ जमीनमालकाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या नावावरील मुखत्यारपत्राचा वापर करून जमिनीची विक्री केल्याचा प्रकार मुंब्रा येथे उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्रीखत तयार करून सरकारी नोंदींमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. अकील जाकी खान यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मुंब्रा येथील विविध सर्व्हे क्रमांकांतील जमीन त्यांचे दिवंगत आजोबा वाजिद अली खान यांच्या मालकीची होती. या जमिनीच्या व्यवहारासाठी २००३ मध्ये इर्रिव्होकेबल जनरल पॉवर ऑफ अटर्नी तयार करण्यात आले होते, मात्र या दस्तऐवजावर बनावट सह्या करून जमिनीच्या व्यवहाराचा मार्ग मोकळा करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
वाजिद अली खान यांचे २००८ मध्ये निधन झाले. त्यानंतरही या मुखत्यारपत्राच्या आधारे २०१३ मध्ये जमिनीचे विक्रीखत तयार करून सुमारे सहा लाख रुपयांचा व्यवहार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढे २०१७ मध्ये नगर भूमापन कार्यालयात जमिनीचे सीमांकन आणि विभाजनाची प्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी चुकीची कागदपत्रे सादर करून सरकारी नोंदींमध्ये फेरफार केल्याचाही आरोप आहे.
संबंधित जमिनीवर अल-मुन्तशिरा रियल्टीच्या माध्यमातून अनधिकृत बहुमजली बांधकाम करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. जमिनीच्या मालकीचा वाद असताना बांधकाम कसे झाले आणि सरकारी कार्यालयांमध्ये नोंदी कशा बदलल्या, याची चौकशी करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. याप्रकरणी रफिक वास शेख, फरजाना रफिक शेख, जाकिया चांद पराशा शेख, नुरुल्ला हक पेंडुलकर खान आणि गयासुद्दीन रियाजुद्दीन खान यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुंब्रा पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.