१८ वर्षांनी न्याय; २१ गोविंदा निर्दोष
ठाण्यातील टेंभी नाका येथे दहीहंडीच्या दिवशी हाणामारी
ठाणे शहर, ता. ८ (बातमीदार) ः दहीहंडीच्या दिवशी ठाण्यात गोविंदा पथकाकडून पोलिसांवर झालेल्या हल्ला प्रकरणातून ठाणे सत्र न्यायालयाने २१ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. १८ वर्षांपूर्वी ठाण्याच्या टेंभी नाका येथील जागतिक विक्रम करणाऱ्या ‘जय जवान गोविंदा पथक’ आणि ‘माझगाव गोविंदा पथका’च्या सदस्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. त्या वेळी दोन्ही गटांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाणे पोलिसांवरही गोविंदांनी हल्ला केला होता. यात काही गोविंदांसह पोलिसही जखमी झाले होते. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्याचा अंतिम निकाल ठाणे सत्र न्यायालयाने दिला आहे.
२५ ऑगस्ट २००८ मध्ये ठाण्यातील प्रसिद्ध टेंभी नाका येथील मानाची हंडी फोडण्याकरिता अनेक भागातून गोविंदा पथके आली होती. त्या वेळी जोगेश्वरी येथील जय जवान आणि माझगाव गोविंदांमध्ये थर लावण्यावरून तुफान राडा झाला होता. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दगड आणि काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या होत्या. त्या वेळी या परिसरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे पोलिसांनी धाव घेतली, मात्र त्यांच्यावरही गोविंदांनी हल्ला केला होता. यात अनेक गोविंदासह पोलिस जखमी झाले होते. तसेच पोलिस वाहनांचेही नुकसान झाले होते.
पुराव्यांमधील त्रुटींवर बोट
या प्रकरणात ठाणे नगर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते. घटनेच्या १८ वर्षांनंतर या प्रकरणाची अंतिम सुनावणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पंकज पत्की यांच्यासमोर झाली. बचाव पक्षाचे वकील एस. एस. बुटाला यांनी सरकारी पक्षाच्या पुराव्यांमधील त्रुटींवर बोट ठेवले. उत्सव पाहण्यासाठी जमलेली तुफान गर्दी आणि त्यातून आरोपींची ओळख शाबित करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याने न्यायाधीशांनी अरुण भालचंद्र पाटील, दर्शन पंढरीनाथ पाटील यांच्यासह इतर २१ जणांची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.