निवृत्त कर्मचाऱ्याला १७.६० लाखांचा गंडा
ठाण्यातील घटना; गुंतवणुकीतून नफ्याचे प्रलोभन
ठाणे, ता. ८ : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर भामट्यांनी वर्तकनगर येथील एका ५१ वर्षीय व्यक्तीला १७ लाख ६० हजार ७२४ रुपयांचा गंडा घातला. बनावट ट्रेडिंग ॲपवर ३७ लाख ६५ हजार रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र, ही रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच आणखी २० टक्के सर्व्हिस फी भरण्याची अट घालण्यात आली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे संबंधित व्यक्तीच्या लक्षात आले.
सुधाकर बिरादार असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. १० सप्टेंबरला त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर ट्रेडिंगसंदर्भातील जाहिरात आली होती. त्यावर क्लिक केल्यानंतर ते ‘डेल्टा-ए-९९०७ स्ट्रॅटेजी स्टडी सोसायटी’ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी झाले. या ग्रुपमध्ये अनन्या कुलकर्णी नावाची महिला विविध कंपन्यांच्या शेअर्स आणि आयपीओबाबत माहिती देत होती. सुरुवातीला बिरादार यांनी केवळ ग्रुपमधील माहिती पाहिली. त्यानंतर अनन्या हिने त्यांना वैयक्तिक संदेश पाठवून गुंतवणुकीचा सल्ला दिला. तिने पाठवलेल्या लिंकवरून डेल्टा ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी करण्यास सांगितले. सुरुवातीला पाच हजार रुपये आणि त्यानंतर आणखी सात हजार ७४२ रुपये भरल्यानंतर ॲपवर १४ हजार ५०६ रुपयांचा नफा दिसू लागला. त्यातील सात हजार ५०० रुपये त्यांनी बँक खात्यात काढून घेतले. त्यामुळे या ट्रेडिंग ॲपवर त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर अनन्या आणि ग्रुपमधील कस्टमर सर्व्हिसच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. शेअर्स आणि आयपीओ खरेदीच्या नावाखाली बिरादार यांनी टप्प्याटप्प्याने एकूण १७ लाख ६० हजार ७२४ रुपये भरले. ॲपवर त्यांच्या गुंतवणुकीवर ३७ लाख ६५ हजार रुपयांचा नफा झाल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांनी त्यातील १८ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पैसे खात्यात जमा झाले नाहीत. चौकशी केली असता नफ्याची रक्कम काढण्यासाठी आणखी २० टक्के सर्व्हिस फी भरावी लागेल, असे सांगण्यात आले. या मागणीनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बिरादार यांनी वर्तकनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.