फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडली
प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रणेवर ‘आवाज’चे प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईत ध्वनी आणि वायुप्रदूषणात वाढ झाल्याचे निरीक्षण ‘आवाज फाउंडेशन’ने नोंदविले. रविवारी (ता. ८) लक्ष्मीपूजनाच्या रात्री शहरातील विविध भागांत फटाके फोडण्यात आले. त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने वायुप्रदूषणात वाढ झाली.
विशेष म्हणजे, दिवाळीनंतरच्या सकाळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या केंद्रांवर हवेची गुणवत्ता खराब असल्याचे दिसत असताना वांद्रे आणि खार परिसरातील बांधकामस्थळांवरील प्रदूषण मोजणाऱ्या फलकांवर मात्र हवा समाधानकारक असल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे प्रदूषण मोजण्याच्या यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे फाउंडेशनने अहवालात म्हटले आहे. फाउंडेशनच्या संयोजिका सुमैरा अब्दुलअली यांनी रविवारी रात्री आठ ते सव्वाअकरा या वेळेत शहरातील विविध भागांची पाहणी केली. कार्टर रोड, माहीम, दादर, शिवाजी पार्क, प्रभादेवी, वरळी, हाजीअली, मरीन ड्राइव्ह, कफ परेड आणि कुलाबा येथे मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात असल्याचे आढळले. बहुतांश ठिकाणी फुलबाज्या, अनार आणि चक्र यांसारख्या फटाक्यांचा वापर झाला. फटाके तुरळक स्वरूपात आणि वेगवेगळ्या ठिकाणी फोडले जात असल्याने ध्वनिप्रदूषणाची डेसिबल पातळी मोजता आली नाही, मात्र सर्व ठिकाणी फटाक्यांमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
प्रदूषणाच्या नोंदीत तफावत
लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुंबईतील ‘पीएम’ २.५चे प्रमाण रात्री ९.३४ वाजता प्रतिघनमीटर १९२ मायक्रोग्रॅमपर्यंत पोहोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वांद्रे रेक्लमेशन आणि कलानगर येथील केंद्रांवर हवा गुणवत्ता निर्देशांक २३१ नोंदविण्यात आला. ही ‘खराब’ श्रेणी आहे, मात्र याच परिसरातील १४ बांधकामस्थळांवरील प्रदूषण मोजणाऱ्या फलकांची तपासणी केली असता, १२ कार्यरत फलकांवर पीएम २.५ ची सरासरी पातळी ५०.४ मायक्रोग्रॅम नोंदविण्यात आली. ही ‘समाधानकारक’ श्रेणी होती. काही फलक बंद होते, तर काहींवर जुन्या तारखेची माहिती दिसत होती. एका फलकावर सकाळी ८.४२ वाजता तापमान ४५ अंश सेल्सिअस दाखविण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेची अचूक माहिती मिळत नसल्याचा मुद्दा फाउंडेशनने उपस्थित केला आहे.
रात्री १० नंतरही फटाके
ध्वनिप्रदूषणाच्या नियमांनुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके फोडण्यास मनाई आहे. तरीही कार्टर रोड येथे रात्री ११.१५ वाजेपर्यंत फटाके फोडले जात असल्याचे आढळले. पश्चिम आणि पूर्व उपनगरांतही रात्री १० नंतर फटाके फोडल्याच्या अनेक तक्रारी फाउंडेशनला मिळाल्या.
फटाक्यांमुळे २८ जण जखमी
फटाके फोडताना झालेल्या अपघातांमध्ये मुंबईतील तीन प्रमुख महापालिका रुग्णालयांमध्ये एकूण २८ जणांवर उपचार करण्यात आले. यामध्ये सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात तीन, नायर रुग्णालयात नऊ, तर कूपर रुग्णालयात १६ जणांवर उपचार करण्यात आले. या सर्व रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार देऊन घरी पाठविण्यात आले. एकाही रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही.
...
डोंगरीतील आगीप्रकरणी चौकशी करा!
डोंगरी येथील डॉ. महेश्वरी रोडवरील आगीच्या दुर्घटनेत अग्निशमन दलाची यंत्रणा उशिरा पोहोचल्याचा आरोप करीत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. पहिली अग्निशमन गाडी तब्बल ४५ मिनिटांनी घटनास्थळी पोहोचल्याचा दावा त्यांनी केला असून, मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी महापालिका आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. डोंगरी पोलिस ठाण्यासमोर डॉ. महेश्वरी रोड येथे रविवारी (ता. ८) रात्री सव्वाआठच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे ५०० लघुउद्योग आस्थापना जळून खाक झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे उद्योजक आणि कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
फटाक्यांमुळे आगीचा उच्चांक
२४ तासांत तब्बल १३७ घटनांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : दिवाळी सणाचा आनंदोत्सव सुरू असतानाच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत आगीच्या एकूण १४२ घटनांची नोंद झाली असून, त्यापैकी तब्बल १३७ घटना केवळ फटाक्यांमुळे घडल्या आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे यंत्रणा सतर्क झाली असून, मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने नागरिकांना फटाके फोडताना विशेष काळजी घेण्याचे आणि आग प्रतिबंधक सुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत दिवाळीदरम्यान आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
वर्ष एकूण घटना फटाक्यांमुळे आग
२०२४ २६२ ८०
२०२५ २८९ ११३
२०२६ (एकाच दिवसात) १४२ १३७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.