गुरांची दिवाळी झाली इतिहासजमा!
बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली; पारंपरिक कृषी संस्कृती काळाच्या पडद्याआड
विक्रमगड (बातमीदार) : शेती आणि पशुधनाशी नाते सांगणारी ग्रामीण भागातील दिवाळीची समृद्ध परंपरा आता लोप पावत आहे. दिवाळीत गुरांची पूजा, सजावट, पारंपरिक विधी आणि सामूहिक उत्सवांमुळे गावागावांत उत्साहाचे वातावरण असायचे, मात्र शेतीतील यांत्रिकीकरण आणि पशुधनाची घटती संख्या यामुळे या परंपरेचा साज हरवत चालला आहे. पूर्वी दिवाळी, बलिप्रतिपदा आणि पाडव्याला शेतकरी गायी, बैल व म्हशींना स्वच्छ धुऊन सजवत असत. गावाच्या वेशीवर पेंढा पेटवून त्यावरून गुरांना उडविण्याची प्रथाही होती. यामुळे गुरांना वर्षभर आजार होत नाहीत, अशी श्रद्धा होती. घरासमोर रांगोळी काढून त्यावर शेणाचे पाच पुंजके ठेवून झेंडूच्या फुलांनी पूजा केली जात असे. नंतर हे शेण शेतात खत म्हणून वापरले जाई.
काही गावांत रेडे, बैल आणि बोकड यांच्या झुंजी आयोजित केल्या जात. त्या पाहण्यासाठी ग्रामस्थ माळरानावर जमायचे. त्यानंतर एकमेकांच्या घरी जाऊन फराळाचा आस्वाद घेतला जात असे. या परंपरांमधून गावातील एकोपा आणि आपुलकी जपली जात होती.मात्र, नांगरणी-वखरणीसाठी बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने पशुधनाची संख्या घटली आहे. मजुरांची कमतरता आणि शेतीचा वाढता खर्च यामुळेही शेती करणे कठीण झाले आहे. परिणामी, गुरांची सजावट, शेणाच्या पुंजक्यांची पूजा आणि सामूहिक फराळासारख्या परंपरा दुर्मिळ होत आहेत. ग्रामीण संस्कृतीचा हा वारसा काळाच्या पडद्याआड जात असल्याची खंत ज्येष्ठ शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.