डोंगरीच्या आगीत कोट्यवधींचा माल खाक
पाच ते सहा सिलिंडरचे स्फोट; ९२ ते ९८ गाळ्यांचे नुकसान
फोर्ट, ता. ९ (बातमीदार) : डोंगरी पोलिस ठाण्यासमोरच असलेल्या मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या डोंगरी गॅरेज परिसरात रविवारी (ता. ८) रात्री ९.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुमारे ९२ ते ९८ गाळे आणि त्यांमधील कोट्यवधी रुपयांचा माल खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या परिसरात प्रामुख्याने वाहन दुरुस्तीची छोटी-मोठी गॅरेज होती. मात्र, कालांतराने यातील अनेक गाळ्यांचे विविध व्यवसायांच्या दुकानांमध्ये आणि कारखान्यांमध्ये रूपांतर झाले होते. यामध्ये जरीकामाचे कारखाने, इमिटेशन ज्वेलरी, डेकोरेटर व मंडप साहित्य, ट्रान्सपोर्ट मालाची गोदामे, वेल्डिंग शॉप, मोटारसायकल दुरुस्ती व मॉडिफिकेशन कारखाने, डेंटिंग-पेंटिंग वर्कशॉप, बॅटरी कारखाने, वाहनांच्या टायरची गोदामे, रेडिमेड कपड्यांचे कारखाने तसेच कार ॲक्सेसरीजची दुकाने अशा अनेक लहान-मोठ्या व्यावसायिक आस्थापनांचा समावेश होता. या सर्व आस्थापनांना आगीचा मोठा फटका बसला.
आगीच्या भक्ष्यस्थानी गॅस सिलिंडर आल्याने पाच ते सहा सिलिंडरचे स्फोट झाले. त्यामुळे आगीचा भडका उडाला. आगीच्या मोठमोठ्या ज्वाळा आणि त्यातून निघणाऱ्या दाट धुरामुळे संपूर्ण परिसरात काळोख पसरला होता. स्थानिक आमदार अमीन पटेल, खासदार अरविंद सावंत आणि नगरसेवक ज्ञानराज निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीची माहिती घेतली. सोमवारी व्यावसायिकांनी साफसफाईला सुरुवात केली. आगीत जळालेल्या मालाची गोळाबेरीज करून नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू होते. विविध कारखान्यांतील यंत्रसामग्री आणि साहित्य खाक झाले होते. संपूर्ण परिसरात जळालेल्या वस्तूंचा उग्र वास येत होता.
या आगीत आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे.
- रियाज शेख, गॅरेजमालक
फटक्यांनीच आग लागली की अन्य कशाने याचा अजून खुलासा झालेला नाही. या आगीत आमचे डेकोरेशनचे साहित्य जळाले आहे.
- ताहीर वाडीवाला, मंडप डेकोरेटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.