घरफोडी, वाहनचोरीचे १२ गुन्हे उघड
तिघे जेरबंद ; गुन्हे शाखेची कारवाई
भिवंडी, ता. ११ (वार्ताहर) : भिवंडी आणि ठाणे शहरातील घरफोडी व वाहनचोरीच्या घटनांचा तपास करत भिवंडी गुन्हे शाखेने सराईत चोरट्यांच्या त्रिकूटाला अटक केली आहे. या कारवाईत पाच वाहनचोरी आणि सात घरफोडी अशा एकूण १२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून ११ लाख २७ हजार रुपये किमतीचे २३५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करीत होते. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र आल्हाट यांना मिळालेली गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. त्यानुसार शमशुहुदा रईस कुरेशी ऊर्फ गोलू (वय ३६, रा. खाडीपार, भिवंडी) आणि साहिल नजमे हसन खान (वय २३) यांचा माग काढण्यात आला. प्रतापगड, उत्तर प्रदेश येथे आठ दिवस पाळत ठेवल्यानंतर उत्तर प्रदेश एसटीएफच्या मदतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले, तर तिसरा आरोपी मोहम्मद सरवर फतेह मोहम्मद अन्सारी ऊर्फ गुड्डू याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी प्रयागराज येथील फरार साथीदार मोहम्मद शमशाद मोहम्मद अहमद ऊर्फ राजू याच्यासोबत संगनमत करून भिवंडीत घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी १२ गुन्ह्यांची उकल केली असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.