साई चौकात रंगली संगीताची पहाट
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : ‘बेबी डॉल’ या गाण्यामुळे लोकप्रिय झालेल्या गायिका कनिका कपूर यांच्या हिंदी चित्रपटगीतांनी कल्याणमधील दिवाळी पहाट कार्यक्रमात रंग भरला. त्यांच्या गाण्यांवर रसिकांनी ठेका धरला. यासोबतच कोकणातील पाच तरुणींच्या ‘कोकण कलेक्टिव्ह बँड’ने मराठी, कोकणी आणि हिंदी गीतांचे सादरीकरण केले. भाजप आणि कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने खडकपाडा येथील साई चौकात नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती.
कल्याणचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या उद्देशाने २०१७ पासून साई चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा प्रथमच कनिका कपूर आणि कोकण कलेक्टिव्ह बँडने या कार्यक्रमात सादरीकरण केले. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
या वेळी कनिका कपूरने लोकप्रिय गीते सादर केली. तिच्या गाण्यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही गाणी सादर करताना त्यांनी थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन गायन केले. त्यामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कोकण कलेक्टिव्ह बँडच्या पाच तरुणींनी गणेश वंदनेने सादरीकरणाला सुरुवात केली. मराठी, कोकणी आणि हिंदी गीतांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमात संगीताचा वेगळा रंग अनुभवायला मिळाला.
या वेळी कपिल पाटील यांनी दिवाळी पहाट उपक्रमाला गेल्या आठ वर्षांपासून कल्याणकरांचा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. तसेच ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा उल्लेख केला.
कार्यक्रमाला आगरी कोळी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अर्जुन भोईर, अर्जुन म्हात्रे, वरुण पाटील, जयवंत भोईर, दया गायकवाड, उपेक्षा भोईर, प्रेमनाथ म्हात्रे, वैशाली पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, नगरसेवक सुमित पाटील, सिद्धेश पाटील आणि जतीन प्रजापती यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.