दिवाळीनंतर उल्हासनगर चकाचक
४७० टन कचरा हटवून बाजारपेठा स्वच्छ
उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झालेली प्रचंड गर्दी आणि वाढलेल्या व्यावसायिक उलाढालीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. सणानंतर निर्माण झालेल्या या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल ४७० मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. त्यामुळे कचऱ्याने व्यापलेल्या प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यांनी पुन्हा स्वच्छतेचा श्वास घेतला.
दिवाळीच्या काळात शहाड स्टेशन मार्केट रोड, एक नंबर भाजी मार्केट, गजानन मार्केट, टिळक मार्केट, जपानी मार्केट, फर्निचर मार्केट, शिरू चौक, गोल मैदान, नेहरू चौक, चार नंबर मेन बाजार, गाऊन मार्केट, लालचक्की तसेच दुधनाका ते कैलास कॉलनी या परिसरात ग्राहकांची मोठी गर्दी होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे बाजारपेठांमधील वर्दळ वाढली होती. परिणामी दुकाने, रस्ते आणि पदपथांवर कचऱ्याचे ढीग साचले होते. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली होती.
ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या निर्देशानुसार विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण आणि आरोग्य उपायुक्त डॉ. दीपाली चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने यंत्रणा कामाला लावली. कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी चार जेसीबी, १३ डम्पर, १८ कॉम्पॅक्टर, नऊ टिप्पर, ८६ घंटागाड्या आणि चार पॉवर स्वीपिंग मशीन तैनात करण्यात आल्या होत्या. सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाजारपेठा आणि प्रमुख रस्त्यांवरील कचरा हटविण्यात आला.
नियोजनबद्ध पद्धतीने राबविलेल्या या मोहिमेत ४७० मेट्रिक टन कचऱ्याची उचल करण्यात आल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार यांनी दिली. दरम्यान, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर किंवा उघड्यावर कचरा टाकू नये. कचरा घंटागाड्यांमध्येच टाकून महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.