नाट्यदिग्दर्शक प्रा. मंदार टिल्लू यांचे निधन
ठाणे, ता. ११ (बातमीदार) : बालरंगभूमीच्या माध्यमातून अनेक पिढ्यांतील बालकलाकारांना अभिनयाचे व्यासपीठ मिळवून देणारे ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक, निर्माते तसेच गंधार कला संस्थेचे अध्यक्ष प्रा. मंदार टिल्लू यांचे बुधवारी (ता. ११) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी पल्लवी टिल्लू आणि परिवार आहे.
प्रा. टिल्लू यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन दुपारी १२ ते ३ या वेळेत मानपाडा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी ४ वाजता बाळकूम येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने ठाण्याच्या सांस्कृतिक, नाट्य आणि बालरंगभूमी क्षेत्रावर शोककळा पसरली असून, बालकलाकार घडविणारा एक समर्पित मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
पत्नी पल्लवी टिल्लू यांच्या साथीने त्यांनी ठाण्यात गंधार कला संस्थेची स्थापना केली होती. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बालनाट्य, नाट्य प्रशिक्षण शिबिरे आणि विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले. लहान मुलांमधील अभिनयकौशल्य विकसित करण्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व घडविण्यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बालकलाकारांनी रंगभूमीवर आपली ओळख निर्माण केली.
‘खेळण्यांची करामत’, ‘आता कसं वाटतंय’, ‘नाटू नाटू’, ‘जादूचा दिवा’, ‘हिमगौरी आणि सात बुटके’ अशा विविध बालनाट्यांची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केले. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे नाटकही बालकलाकारांच्या सहभागातून रंगमंचावर आणले. डिजिटल माध्यमातून बालनाट्य सादर करण्याचा अभिनव प्रयोगही त्यांनी केला होता.
नाट्यक्षेत्रासोबतच चित्रपटसृष्टीतही त्यांनी योगदान दिले. ‘मंकी बात’ या मराठी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. नवोदित कलाकारांना मार्गदर्शन मिळावे यासाठी नाट्य प्रशिक्षण शिबिरांमध्ये माधव देवचके, सचिन पिळगावकर यांसारख्या कलाकारांना सहभागी करून घेतले. तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी गंधार कला संस्थेच्या माध्यमातून ‘गंधार गौरव सोहळ्या’ची परंपरा सुरू केली. कोकण महोत्सवासारख्या उपक्रमांतून सांस्कृतिक आणि बोलीभाषेच्या प्रसारासाठीही ते कार्यरत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.