बाळविक्रीप्रकरणी रत्नागिरीतून खरेदीदाराला अटक
आरोपींची संख्या ११, मुख्य सूत्रधार पसार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : वंशाला दिवा हवा म्हणून अवघ्या २० दिवसांच्या चिमुकल्या बाळासाठी साडेसहा लाख रुपये मोजणाऱ्या रत्नागिरीतील शुभम किर (वय ३०) याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. बाळविक्री प्रकरणात खरेदीदारालाही अटक झाल्याने आरोपींची संख्या ११ झाली आहे. या व्यवहाराचा मुख्य सूत्रधार प्रवीण साळुंखे अद्याप पसार असून, त्याचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या अकराही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक वृषाली पवार यांनी दिली.
कळवा येथील शांतीनगर परिसरातील १९ वर्षीय महिला मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करते. तिच्या २० दिवसांच्या बाळाच्या विक्रीसाठी रेहान शेख याने दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरुवातीला या व्यवहारात अडीच लाख रुपयांचा सौदा झाल्याची माहिती समोर आली होती, मात्र पोलिस तपासात रत्नागिरीतील शुभम किर याने साडेसहा लाख रुपये देऊन बाळ विकत घेतल्याचे उघड झाले. किर याला मुलीच असून, मुलगा नसल्याने त्याने प्रतिभा परब हिच्या मध्यस्थीने बाळ खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात ज्योती पाटील, रेहान शेख, फरहान शेख, फरिदा सय्यद आणि हुस्ना शेख यांना मुंब्रा येथून अटक करण्यात आली. त्यानंतर अनिता धोत्रे, सुनीता खैरनार, गोपीनाथ धोत्रे, प्रतिभा परब आणि शिल्पा साठे यांनाही वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली.
रोखीने झाला व्यवहार
बाळविक्रीचा व्यवहार रोखीने झाल्याचे तपासात समोर आले आहे. नातेवाइकांच्या त्रासाला कंटाळून मुलगा दत्तक घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र दत्तक प्रक्रियेतील अडचणींमुळे तो प्रयत्न पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे मध्यस्थ प्रतिभा परब हिच्या मदतीने बाळ विकत घेतल्याचे किर याने पोलिसांना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.