रांगोळ्यांतून समाजप्रबोधनाचा जागर
दिवाळीच्या रंगांतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
वसई, ता. १२ (बातमीदार) : दिवाळी म्हटले की घरासमोरील आकर्षक रांगोळ्या, पणत्यांची रोषणाई आणि उत्साहाचे वातावरण डोळ्यांसमोर येते, मात्र नालासोपारा पूर्वेकडील साई दर्शन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीने यंदा दिवाळीच्या पारंपरिक उत्सवाला सामाजिक जाणिवेची जोड देत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सोसायटीतील प्रत्येक सदनिकेसमोर साकारलेल्या आकर्षक आणि संदेशप्रधान रांगोळ्यांमधून दुष्काळ, वृक्षतोड आणि जलसंधारण यांसारख्या ज्वलंत विषयांवर समाजप्रबोधन करण्यात आले आहे.
काही रांगोळ्यांमधून बेसुमार वृक्षतोडीचे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम अधोरेखित करण्यात आले आहेत. वृक्षांची घटती संख्या, निसर्गाचा ढासळता समतोल आणि वाढत्या तापमानाचे संकट याकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले आहे, तर काही रांगोळ्यांमधून पावसाअभावी निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती आणि त्याचा शेतकऱ्यांच्या जीवनावर होणारा परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, त्याचा जपून वापर करणे आणि पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे किती आवश्यक आहे, याचाही संदेश देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या उपक्रमात लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग आहे. लहान वयातच पर्यावरण संवर्धन, पाण्याचे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा विचार आहे. त्यामुळे रांगोळीच्या माध्यमातून केवळ कलाविष्कारच नव्हे, तर पुढील पिढीमध्ये सामाजिक भान रुजवण्याचाही प्रयत्न झाला आहे.
या बोलक्या रांगोळ्या पाहण्यासाठी परिसरातील अन्य सोसायट्यांमधील नागरिकही आवर्जून भेट देत आहेत. प्रत्येक रांगोळीसमोर थांबून त्यामागील संदेश समजून घेतला जात असून, या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. दिवाळीचा आनंद केवळ घराच्या सजावटीपुरता मर्यादित न ठेवता समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. सण साजरा करताना सामाजिक भान आणि पर्यावरण संवर्धनाचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे रहिवासी नमिता कुडाळकर यांनी सांगितले.
छायाचित्र ओळ : वसई : साई दर्शन सोसायटीत रांगोळ्यांतून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.