कुंडलिका नदी प्रदूषणाच्या विळख्यात
मासळीविक्रेत्यांचा कचरा, औद्योगिक रसायने आणि सांडपाण्यामुळे जलस्रोत धोक्यात; दोषींवर कारवाईची मागणी
रोहा, ता. १२ (बातमीदार) : रोहा तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या कुंडलिका नदीचे पाणी विविध कारणांमुळे प्रदूषित होत आहे. चिकनविक्रेत्यांकडून टाकण्यात येणारा कचरा, गावांमधील अशुद्ध सांडपाणी आणि धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांसाठी वरदान ठरणारा हा जलस्रोत दूषित होत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
शहरातील काही चिकनविक्रेते कोंबड्यांची पिसे, पाय, मुंडकी आणि आतड्या रात्रीच्या वेळी नदीपात्रात टाकत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरासह आसपासच्या गावांमधील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. तसेच काही कंपन्यांकडून रसायनयुक्त सांडपाणी नदीत सोडले जात असल्याची तक्रार आहे. पुलावरून निर्माल्य आणि प्लॅस्टिक पिशव्याही नदीत टाकल्या जात आहेत.
ग्रामीण भागाला पाण्याचा आधार
पाणीटंचाईच्या काळात कुंडलिका नदी ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक आणि जनावरांसाठी महत्त्वाचा आधार ठरते, मात्र दूषित पाण्यामुळे जनावरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
दोषींवर कठोर कारवाई करा
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. नदीपात्रात कचरा टाकणारे, सांडपाणी सोडणारे तसेच पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. नदीच्या दोन्ही टोकांवर कचरा टाकण्यास मनाई करणारे फलक लावून जनजागृती करावी, अशी मागणी भाजपचे रोहा तालुका सरचिटणीस शैलेश रावकर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.