उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : जिल्हाधिकाऱ्यांचे बंदी आदेश धाब्यावर बसवत उल्हासनगरात दिवाळीच्या आतिषबाजीचा धुमाकूळ मध्यरात्रीनंतरही सुरूच राहिला. रॉकेट आणि सुतळी बॉम्बवर बंदी असतानाही शहरातील विविध भागांत मोठ्या आवाजाचे फटाके फुटत राहिले. पोलिसांची गस्त सुरू असतानाही नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी रॉकेट आणि सुतळी बॉम्बच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. मात्र, उल्हासनगरात या आदेशांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील कॅम्प क्रमांक एक ते पाच मधील विविध निवासी परिसर, मुख्य रस्ते आणि गृहसंकुलांच्या आवारात मध्यरात्रीनंतरही रॉकेट सोडण्यासह मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. फटाक्यांचा आवाज इतका मोठा होता की, घरांच्या खिडक्या आणि दरवाजे हादरत असल्याचा अनुभव नागरिकांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे पोलिसांकडून रात्रीची गस्त सुरू असतानाही फटाके फोडणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचे दिसून आले. पोलिसांची गस्त संपताच काही ठिकाणी पुन्हा आतिषबाजी सुरू होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला. यंदा उल्हासनगरात फटाक्यांमुळे आगीच्या अनेक घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.