मुंबई

दिवाळीतही संघर्षाचे चटके

CD

दिवाळीतही संघर्षाचे चटके

पाटे विक्रीसाठी खानदेशातील कुटुंबाची भटकंती

मोखाडा, ता. १२ (बातमीदार) : दिवाळीचा सण म्हटला की घराघरांत आनंद, फराळ आणि रोषणाईची लगबग सुरू असते, मात्र उदरनिर्वाहासाठी गाव, घरदार सोडून भटकंती करणाऱ्या गरीब कुटुंबांच्या वाट्याला सणासुदीतही संघर्षच येत आहे. खान्देशातील चाळीसगाव येथून पाटे विक्रीसाठी खोडाळा येथे आलेल्या एका कुटुंबाला मुख्य रस्त्याच्या कडेला उघड्यावर संसार थाटण्याची वेळ आली आहे. दिवसभर ग्राहकांची प्रतीक्षा करूनही विक्री होत नसल्याने या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्याच्या कडेला दगडी पाटे विक्रीसाठी मांडले असून, बाजूलाच पाण्याचे कॅन, हंडे, कपड्यांची बोचकी आणि लहान मुलांचे साहित्य असा संपूर्ण संसार उघड्यावर पडला आहे. लेकराबाळांसह आलेले हे कुटुंब दिवसभर उन्हात बसून ग्राहकांची वाट पाहत आहे, मात्र पाट्यांच्या विक्रीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. चाळीसगाव ते खोडाळा प्रवासासाठी केलेले पाच हजार रुपयांचे वाहनभाडे तरी विक्रीतून वसूल होईल का, अशी चिंता त्यांना सतावत आहे.

पारंपरिक व्यवसायावर आधुनिकतेचे सावट
पूर्वी प्रत्येक घरात पाटा-वरवंट्याचा वापर होत असे, मात्र मिक्सर आणि ग्राइंडरच्या वाढत्या वापरामुळे या पारंपरिक व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. ग्रामीण भागात अजूनही पाट्यांना मागणी मिळेल, या आशेने कारागीर गावोगावी भटकंती करतात, मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे विक्रीवर परिणाम झाला असून, हाताला काम आणि कुटुंबाला पुरेसे उत्पन्न मिळणेही कठीण झाले आहे. आधुनिकतेच्या प्रवाहात पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासोबतच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची कसरत या कारागिरांना करावी लागत आहे.

सणासुदीच्या काळातही उघड्यावर संसार मांडून उपजीविकेसाठी धडपडणाऱ्या या कुटुंबाची परिस्थिती समाजाच्या संवेदनशीलतेची जाणीव करून देणारी आहे. स्थानिक नागरिकांनी या कारागिरांकडून पाटे खरेदी करून त्यांना आर्थिक हातभार लावण्याची गरज आहे. तसेच दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनीही मदतीसाठी पुढाकार घेतल्यास या कुटुंबाच्या आयुष्यात दिलासादायक प्रकाश निर्माण होऊ शकतो.

छायाचित्र ओळ : खोडाळा : रस्त्याच्या कडेला पाटे विक्रीसाठी मांडून ग्राहकांची प्रतीक्षा करणारे खान्देशातील कारागीर कुटुंब.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईला उडवणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच, पुन्हा बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Novaya Gazeta: ६ पत्रकारांची हत्या, ३३ वर्षांचा संघर्ष; रशियातील शेवटचे मोठे स्वतंत्र वृत्तपत्रही बंद

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! राज्यात अवघ्या ७ महिन्यांत रस्ते अपघातात ९,१९५ जणांचा मृत्यू

Pune Cyber Crime: बनावट अटक वॉरंट, व्हिडिओ कॉल आणि धमक्या; पुण्यातील वृद्ध महिलेची 32 लाखांची फसवणूक

विनयभंगानंतर तरुणीला लोकलखाली ढकलल्याचा आरोप; नायगाव स्थानकातील धक्कादायक घटना|Naigaon | Mumbai news

SCROLL FOR NEXT