मुंबई, ता. १२ : भारतीय रंगभूमीवर भाषा, लोकपरंपरा आणि सादरीकरणाच्या वेगवेगळ्या शैलींतून नाटकांचे विविध प्रयोग होतात. या प्रादेशिक आणि कलात्मक वैविध्याचा परिचय मुंबईकरांना करून देण्यासाठी नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) आणि टीमवर्क आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसांचा नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ‘एनसीपीए’च्या प्रायोगिक रंगमंचावर हा महोत्सव होणार असून, मल्याळम, बंगाली, बुंदेली आणि हिंदी भाषांतील चार नाटकांचे सादरीकरण केले जाणार आहे.
‘महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्डस्’ (मेटा) या नाट्य पुरस्कार सोहळ्याच्या २०२३, २०२५ आणि २०२६ या वर्षांतील सादरीकरणांमधून या नाटकांची निवड करण्यात आली आहे. पारंपरिक कथकलीपासून लोकनाट्य, पौराणिक आशय आणि संवादाविना कथन करणाऱ्या प्रयोगापर्यंत विविध प्रकार या महोत्सवात पाहायला मिळतील. महोत्सवाची सुरुवात गुरुवारी (ता. १२) ‘द ओल्ड मॅन अँड द सी-कथकली ऑफ द मॉरो’ या मल्याळम नाटकाने झाली. शुक्रवारी (ता. १३) सुमन साहा दिग्दर्शित ‘निःसंगो ईश्वर’ हे बंगाली नाटक सादर होणार आहे. १४ नोव्हेंबरला ‘द डिपार्टेड डॉन’ हा संवादाविना सादर होणारा ६० मिनिटांचा प्रयोग पाहता येईल. तसेच महोत्सवाची सांगता १५ नोव्हेंबरला ‘स्वांग : जस की तस’ या नाटकाने होणार आहे. टीमवर्क आर्टस् प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय के. रॉय यांनी भारतीय रंगभूमीतील भाषा, संहिता आणि नाट्यपरंपरांच्या वैविध्याचा उल्लेख केला. तर ‘एनसीपीए’च्या नाट्य आणि चित्रपट विभागाचे प्रमुख ब्रूस गुथ्री यांनी २०२६ मधील महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर आर्टस्चे ‘एनसीपीए’मध्ये स्वागत करताना आनंद व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.