कोनच्या घरांना गिरणी कामगारांचा नकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : ‘गिरणी कामगारांना म्हाडाच्या माध्यमातून कोन-पनवेल येथील सुमारे १,०८६ घरे दिली जाणार असून, त्याचा ताबा घेण्यासाठी विजेत्यांनी पुढे यावे,’ असे आवाहन म्हाडाने केल्यानंतरही कामगारांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. यामध्ये १,०८६ पैकी केवळ ३५ विजेत्या कामगारांनी घराचा ताबा घेण्यासाठी अर्ज केल्याने या घरांची प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्याबाबत म्हाडाचा विचार सुरू आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०१६ मध्ये कोन-पनवेल येथे गिरणी कामगारांसाठी २,४१७ घरांची लॉटरी काढली होती. मात्र घर मुंबईपासून दूर असल्याने पायाभूत सुविधांचा अभाव आणि नोकरी-व्यवसाय मुंबईत असल्याने अनेक विजेत्यांनी ताबा घेण्यास टाळाटाळ केली. परिणामी १,०८६ घरे आजही धूळखात पडून आहेत. त्यामुळे या घरांच्या देखभालीचा खर्च वाढत असल्याने म्हाडाने ३ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देत विजेत्यांना घर घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते. मुदतीत अर्ज न केल्यास प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्याचा इशाराही दिला होता. मात्र मुदत संपल्यानंतरही केवळ ३५ विजेत्यांनीच म्हाडाकडे अर्ज करीत ताबा घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे संबंधित गिरणी कामगारांना राजी कसे करायचे, असा प्रश्न म्हाडासमोर उभा राहिला आहे.