ठाण्यात तीन ठिकाणी नवे पादचारी पूल
एमएमआरडीए उचलणार खर्च; मानपाडा, आर मॉल येथील जुने पूल हटविणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : ठाण्यातील वाहतूककोंडी कमी करण्याबरोबरच पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तीन ठिकाणी पादचारी पुलांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्तकनगर नाका येथे नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार असून, घोडबंदर मार्गावरील मानपाडा आणि आर मॉल परिसरातील जुने पूल हटवून त्या ठिकाणी नवीन पूल अथवा स्कायवॉक उभारण्यात येणार आहेत. या तिन्ही कामांचा संपूर्ण खर्च एमएमआरडीए करणार असून, त्यासाठी ठाणे महापालिकेच्या महासभेची मंजुरी घेतली जाणार आहे.
शहरातील मेट्रो प्रकल्प, रस्त्यांचे रुंदीकरण आणि वाहतूक सुधारणा प्रकल्पांमुळे काही ठिकाणी जुन्या पादचारी पुलांची रचना अडचणीची ठरत आहे. विशेषतः घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते मुख्य मार्गाला जोडण्याच्या कामात पुलांचे रॅम्प अडथळा ठरत आहेत. त्यामुळे बदलत्या वाहतूक व्यवस्थेला अनुरूप नवीन पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
-------------
वर्तकनगर नाक्यावर नवीन पूल
पोखरण रोड क्रमांक एकवरील वर्तकनगर नाका परिसरात लोकवस्ती आणि वाहनांची संख्या वाढत आहे. कॅडबरी सिग्नल ते उपवनदरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने या मार्गावरील वाहनांचा वेग वाढला आहे. परिसरात शाळांची संख्या अधिक असल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका निर्माण होत आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी येथे स्वतंत्र सिग्नल बसविण्यात आला असला, तरी त्यामुळे वाहनांच्या रांगा लागून वाहतूककोंडी वाढत आहे. या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने २०१९-२० मध्ये पादचारी पुलाचा प्रस्ताव तयार केला होता. २० जानेवारी २०२०ला महासभेने त्याला मंजुरीही दिली होती; मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता.
-----------
घोडबंदरवरील जुन्या पुलांच्या रचनेचा अडथळा
मानपाडा आणि आर मॉल अर्थात तत्त्वज्ञान विद्यापीठ परिसरात महापालिकेने २०१६-१७ मध्ये पादचारी पूल उभारले होते. मात्र, घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते मुख्य रस्त्याला जोडण्याच्या कामात या पुलांचे रॅम्प अडथळा ठरत आहेत.
आर मॉलसमोरील पुलाचा रॅम्प ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या बाहेर पडणाऱ्या मार्गिकेत अडथळा निर्माण करीत आहे. तसेच मेट्रो स्थानकाच्या कामासाठी लागणाऱ्या क्रेन आणि अवजड यंत्रसामग्रीच्या वाहतुकीतही अडचणी येत आहेत. सध्याच्या पुलांची रचना मेट्रो स्थानकांशी जोडणीसाठी अनुकूल नसल्याने ते हटवून नवीन स्वरूपातील पूल अथवा स्कायवॉक उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
-------------
एमएमआरडीएकडून स्वखर्चाने कामे
एमएमआरडीएच्या अभियंत्यांसोबत ७ सप्टेंबर २०२६ला या तिन्ही ठिकाणांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने या कामांना सहमती दर्शविणारा प्रस्ताव तयार केला आहे. वर्तकनगर येथे नवीन पूल तर मानपाडा आणि आर मॉल येथे पर्यायी पादचारी पूल अथवा स्कायवॉक उभारण्याचा संपूर्ण खर्च एमएमआरडीए करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.