कल्याण, ता. १५ (वार्ताहर) : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक २८२ आणि २८४ मधील तब्बल ५० गुंठे जागा लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला देण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित संघटनेला यापूर्वीच ३२४ व्यापारी गाळे उपलब्ध करून दिले असताना पुन्हा भूखंड देण्याची गरज काय होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तत्कालीन प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे यांनी हा निर्णय घेताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली होती का, याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया २१ मे २०२५ रोजी जाहीर झाली होती. २९ जून २०२५ मध्ये संचालक मंडळाची निवडणूक होऊन नवीन संचालक निवडून आले. मात्र, सभापती आणि उपसभापतींची निवड होण्यापूर्वीच ३० जून २०२५ ला तत्कालीन प्रशासक डॉ. मांडे यांनी लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला ५० गुंठ्यांचा भूखंड देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पणन संचालकांकडे प्रस्तावही पाठविल्याचे कथोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, भूखंड वाटपाच्या निर्णयाला बाजार समितीतील व्यापाऱ्यांचाही विरोध आहे. व्यापारी गणेश पोखरकर यांनी या निर्णयावर आक्षेप घेत बाजार समितीच्या मालमत्तेचा वापर एखाद्या संघटनेच्या फायद्यासाठी होऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. या प्रकरणातील भूखंड वाटपाची प्रक्रिया, त्यासाठी वापरलेली कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि बाजार समितीला मिळणारा मोबदला यांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणनमंत्री जयकुमार रावल आणि पणन सचिवांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत तत्कालीन प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.
नव्या भूखंडाची गरज काय?
संबंधित संघटनेला २००९ मध्ये व्यापारासाठी गाळे बांधून देण्यात आले होते. त्यानंतर २०१२ मध्ये ‘ए’ इमारतीत ३२४ गाळे उपलब्ध करून देण्यात आले. असे असतानाही पुन्हा ५० गुंठ्यांचा भूखंड देण्याची आवश्यकता काय होती, असा सवाल कथोरे यांनी उपस्थित केला आहे. भूखंड वाटप करताना लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेचे नोंदणी प्रमाणपत्र, लेखापरीक्षण अहवाल, कार्यकारी मंडळाची माहिती आणि संघटनेची घटना यांसारख्या आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली नसल्याचा दावाही करण्यात आला आहे. प्रशासकांनी पणन संचालकांकडे सादर केलेली कागदपत्रे चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचा दावा कथोरे यांनी केला आहे. या कागदपत्रांच्या आधारे पणन संचालकांनी पणन कायदा व नियमांनुसार आवश्यक पडताळणी न करताच १२/१ ची परवानगी दिल्याचा आक्षेपही निवेदनात नोंदविण्यात आला आहे.
समितीचे आर्थिक नुकसान
संबंधित ५० गुंठ्यांचा भूखंड दहा वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिल्याची माहिती बाजार समितीतील व्यापारी संघटना देत आहे. यासाठी केवळ २० लाख रुपये अनामत रक्कम घेण्यात आली असून, या जागेवर १३० दुकाने बांधून ती अन्य व्यापाऱ्यांना विकण्याची तयारी आहे. या व्यवहारातून बाजार समितीला वर्षाला केवळ अडीच लाख रुपये भाडे मिळणार असल्याचेही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. बाजार समितीच्या मालकीच्या जागेवर पर्यायी बाजारपेठ उभी राहणार असताना त्याचा आर्थिक लाभ बाजार समितीऐवजी खासगी व्यापारी संघटनेला मिळण्याची शक्यता असल्याचा आक्षेप व्यापाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे या व्यवहारामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासक डॉ. किशोर मांडे यांनी अपारदर्शक कारभार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान आणि विकासकामांना अडथळा निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. या संपूर्ण व्यवहाराची चौकशी व्हावी, यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार आहे.
- किसन कथोरे, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.