बेशिस्त पार्किंगचा बेस्टला फटका
सर्वोदयनगर मार्गावर दोन बसची समोरासमोर घासाघीस; अर्धा तास वाहतूक कोंडी
जोगेश्वरी, ता. १६ (बातमीदार) : जोगेश्वरी पूर्वेकडील सर्वोदयनगर मार्गावर शनिवारी (ता. १४) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास दोन बेस्ट बसची समोरासमोर घासाघीस होऊन अपघाताची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही बसच्या बाजूच्या भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सृष्टी रेसिडेन्सी इमारतीसमोर हा प्रकार घडला. बस क्रमांक ३३९ अंधेरीच्या दिशेने, तर बस क्रमांक ३२४ मजास आगाराच्या दिशेने जात होती. सर्वोदयनगर मार्गावरील अरुंद रस्त्यावर दोन्ही बस एकाच वेळी समोरासमोर आल्याने हा प्रकार घडला. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चारचाकी वाहने उभी असल्याने बसचालकांना मार्ग काढताना अडचण निर्माण झाली. पार्क केलेल्या वाहनांना वाचवण्याच्या प्रयत्नात बस क्रमांक ३३९ विरुद्ध दिशेला वळवण्यात आली. त्याचवेळी दोन्ही बस एकमेकांना घासल्याने त्या अडकून पडल्या.
बस एकमेकांपासून वेगळ्या करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला. नागरिकांच्या मदतीने दोन्ही बस बाजूला करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र, या प्रकारामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने
सर्वोदयनगर मार्गावर रस्ता अरुंद असून, दोन्ही बाजूंना चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे या मार्गावर दररोज वाहतुकीचा खोळंबा होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. अशा अरुंद रस्त्यावर मोठ्या वाहनांना मार्ग काढणेही कठीण होत आहे. त्यामुळे किमान या मार्गावर चारचाकी वाहनांच्या पार्किंगला बंदी घालून वाहतुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.