सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : मुंब्र्यातून तीन टांझानियन आणि एका नायजेरियन नागरिकाला सुमारे दीड कोटींच्या एमडीसह अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता दिवा पूर्वेकडील बेतवडे गावातील मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड सोसायटीमधील नायजेरियन दाम्पत्याच्या घरातून तब्बल १० कोटी ६३ लाख २७ हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मुंब्रा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी (ता. १३) केलेल्या या कारवाईत दोन किलो ९८.५ ग्रॅम कोकेन आणि १०४.७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हस्तगत केले.
मुंब्रा पोलिस ठाण्याचे अंमलदार नवनाथ थोरवे यांना बेतवडे येथील सोसायटीत परदेशी नागरिक अमली पदार्थांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन ढगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. सोसायटीच्या औरा इमारतीत हे दाम्पत्य राहत असल्याचे आढळले. पोलिसांनी पंच आणि फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत घराची झडती घेतली. त्या वेळी फ्रीजवर ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यात पांढऱ्या रंगाची पावडर असलेल्या वेगवेगळ्या पिशव्या आढळल्या. तपासणीत त्यामध्ये एमडी आणि कोकेन असल्याचे उघड झाले. अमली पदार्थांसह रिकामे प्लॅस्टिक पाऊच आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटाही जप्त करण्यात आला. या कारवाईत नायजेरियन नागरिक चुकवुएमेका इमॅन्युएल न्वाक्वो (वय ४१) आणि त्याची पत्नी युकेरिया चुकवुएमेका ओबियानुजु (४१) यांचे दोन मोबाईल, पासपोर्ट आणि सात हजार ६०० रुपयांची रोकडही पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १० कोटी ६३ लाखांहून अधिक आहे. दिवा परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.