वाहतूक नियमभंगावर कारवाई
डहाणू पोलिसांचा वाहनचालकांना इशारा
कासा, ता. १७ (बातमीदार) : वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालून नागरिकांची सुरक्षितता राखण्यासाठी डहाणू पोलिसांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. अतिवेगाने वाहन चालविणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे तसेच वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे अशा नियमभंगांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
धोकादायक ओव्हरटेक, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणे ही गंभीर अपघातांची प्रमुख कारणे आहेत. अशा निष्काळजीमुळे वाहनचालकांसह इतर नागरिकांचाही जीव धोक्यात येतो. त्यामुळे दुचाकीस्वारांनी प्रमाणित हेल्मेट, तर चारचाकी चालकांनी सीटबेल्टचा वापर करावा. वाहतूक सिग्नल व वेगमर्यादेचे पालन करून वाहन चालवताना मोबाईल वापरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनांची नियमित तपासणी करून आवश्यक कागदपत्रे वैध ठेवावीत. रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना तातडीने मार्ग द्यावा. अपघात घडल्यास जखमींना मदत करून ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. हेल्मेट आणि सीटबेल्ट हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून जीव वाचविण्यासाठी आहेत. क्षणभराची बेपर्वाई संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभराचे दुःख देऊ शकते. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची जाणीव ठेवून अपघातमुक्त डहाणूसाठी सहकार्य करावे, असे आवाहन डहाणू पोलिस अधिकारी दत्ता शेळके यांनी केले आहे.