मुंबई

काळ्या मातीतले हात गोण्यांच्या ओझ्याखाली!

CD

कोपरखैरणे, ता. १७ (बातमीदार) : ज्या हातांनी काळ्या मातीत घामाचे मोती पेरले, त्याच हातांना आज दुसऱ्यांच्या मालाच्या गोण्या उचलाव्या लागत आहेत. ज्या खांद्यावर कधीकाळी सोन्यासारखे पीक डोलत होते, त्याच खांद्यावर आज ५० ते ७० किलो वजनाचे ओझे आहे. निसर्गाच्या अवकृपेने शेती उद्ध्वस्त झाली आणि स्वाभिमानाने जगणाऱ्या बळीराजावर गाव सोडण्याची वेळ आली. पोटाची खळगी भरण्यासाठी सोलापूरच्या मातनळी गावातील शेतकऱ्यांनी थेट मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ गाठली. शेतात राबणाऱ्या हातांना हमाली करावी लागणारी ही वेळ केवळ शेतकऱ्यांची व्यथा नाही, तर शेतीसमोरील संकटाचे विदारक वास्तव आहे.

वातावरणातील बदल, पावसाचा लहरीपणा आणि अल निनोच्या प्रभावामुळे पावसाने फिरवलेली पाठ याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. ऊस, कापूस आणि तूर यांसारखी पिके डोळ्यांदेखत जळून गेल्याने वर्षभर केलेल्या कष्टावर पाणी फिरले आहे.

शेतीतून काहीच उत्पन्न मिळण्याची आशा उरली नसल्याने या शेतकऱ्यांनी रोजगारासाठी मुंबईची वाट धरली. मुंबई कोणालाही उपाशी झोपू देत नाही, या विश्वासाने ते नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत दाखल झाले. येथील मुकादम मोहम्मद मुंजावर यांच्या माध्यमातून त्यांना सध्या हमालीचे काम मिळत आहे. दिवसभर कष्ट केल्यानंतर प्रत्येकाला सुमारे ५०० रुपये रोजंदारी मिळते. त्यातून स्वतःच्या उदरनिर्वाहापुरते पैसे खर्च करून उर्वरित रक्कम ते आपल्या कुटुंबीयांसाठी गावाकडे पाठवत आहेत.

...तर हमालीचे कामही मिळणे कठीण
या शेतकऱ्यांपैकी काहींचे नातेवाईक मुंबईत असल्याने त्यांना त्यांच्या घरी राहण्याची सोय झाली आहे, मात्र ज्यांचे येथे कोणीही नाही, त्यांना मिळेल त्या ठिकाणी आसरा घेऊन दिवस काढावे लागत आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत एपीएमसीत काम करून पुन्हा गावाकडे परतण्याचा त्यांचा विचार आहे, मात्र दुष्काळामुळे शेतीचे उत्पादन घटल्याने बाजारपेठेत शेतमालाची आवक कमी झाली, तर हमालीचे कामही मिळणे कठीण होईल, अशी धास्ती त्यांना सतावत आहे.

मातनळी गावात आमची तीन एकर शेती आहे, मात्र पावसाअभावी संपूर्ण शेतीतील पीक जळून गेल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन भाऊ, त्यांची कुटुंबे आणि आई-वडील अशा मोठ्या परिवाराची जबाबदारी माझ्यावर आहे.
- निरोद्दिन हुसेनी, मातनळी

आमची गावी सहा एकर शेती असून, दुष्काळामुळे पीक पूर्णपणे करपले आहे. आई-वडील, दोन भाऊ आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे मोठे आव्हान आहे.
- मेहबूब करजगी, मातनळी

काेपर खैरणे : दुष्काळामुळे मातनळीतील शेतकऱ्यांना एपीएमसीत हमाली करावी लागत आहे.

IPL मधील निवृत्तीनंतर शेअर बाजारात एन्ट्री; धोनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा लवकरच येणार IPO

Cabinet Decision: शिक्षण क्षेत्रापासून न्यायालयापर्यंत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ धडाकेबाज निर्णय

Gurnoor Brar: भारताच्या गुरनूर ब्रारला ICC कडून मोठी शिक्षा! वनडेतील भांडण पडलं महागात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

SCROLL FOR NEXT