सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : मुंब्रा परिसरातील अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी नायजेरियन दाम्पत्याला अटक केल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी आणखी एका परदेशी नागरिकाला बेड्या ठोकल्या आहेत. उस्मान बुआरी अली (मूळ रा. सेनेगल) असे अटक केलेल्या तिसऱ्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ५९ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या तिघांकडून आतापर्यंत दोन किलो १५७.५ ग्रॅम कोकेन आणि १०४.७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) असा एकूण १० कोटी ९३ लाखांचा अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे शहर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत आज (ता. १७) दिली.
मुंब्रा पोलिस ठाण्याच्या एनडीपीएस पथकाला बेतवडे येथील मॅरेथॉन नेक्सवर्ड सोसायटीत काही परदेशी नागरिक अमली पदार्थांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोसायटीतील सुमारे ६०० सदनिकांची नियोजनबद्ध तपासणी केली. या शोधमोहिमेत ऑरा इमारतीत राहणाऱ्या नायजेरियन दाम्पत्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात कोकेन आणि एमडी जप्त करण्यात आले. याप्रकरणी १४ नोव्हेंबरला गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.
तपासादरम्यान दाम्पत्याने अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीत उस्मान बुआरी अली याचाही सहभाग असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत ५९ ग्रॅम कोकेन आढळले. अटक केलेल्या दोघांविरोधात यापूर्वी मुंबई आणि नवी मुंबई येथेही गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांचे पासपोर्ट, भारतातील वास्तव्य आणि अन्य गुन्ह्यांतील सहभाग याबाबत पोलिस तपास करत आहेत. न्यायालयाने तिघांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस उपायुक्त पाटील यांनी सांगितले.
वर्षभरात ४३ कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंब्रा एनडीपीएस पथकाने २०२६ या वर्षात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ४२ संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले असून, त्यामध्ये सात परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या कारवायांमध्ये सुमारे ४३ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी गांजा व अन्य अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ६८७ जणांविरोधात, तर सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या ९८० जणांविरोधातही कारवाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.