पोलिस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप
सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर!
स्टेटसवर २० अश्लील चित्रफितींचा मारा; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर हटविण्यात यश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या व्हॉट्सॲप खात्याचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता. १७) उघडकीस आला. त्यांच्या व्हॉट्सॲपवर एकापाठोपाठ सुमारे २० अश्लील चित्रफिती अपलोड करण्यात आल्या. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्याच व्हॉट्सॲप खात्यावर असा प्रकार घडल्याने पोलिस दलात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सायबर गुन्हे अन्वेषण कक्षाने तातडीने तपास सुरू केला. अखेर सायंकाळी ६च्या सुमारास या चित्रफिती हटविण्यात यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डुंबरे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक अश्लील चित्रफिती झळकू लागल्या. एकापाठोपाठ एक अशा सुमारे २० चित्रफिती अपलोड झाल्याने हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. आयुक्तांच्या व्हॉट्सॲप खात्याचा ताबा सायबर गुन्हेगारांनी मिळवला असावा, असा संशय प्राथमिक तपासातून व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर कक्षाच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. दरम्यान, स्टेटसवर चित्रफिती अपलोड होण्याचा प्रकार सुरूच असल्याने त्या हटविण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली. अखेर सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी सर्व चित्रफिती हटविण्यात आल्या. या घटनेला पोलिस उपायुक्त पराग मणेरा यांनी दुजोरा दिला. संबंधित प्रकार निदर्शनास येताच तातडीने कारवाई करून स्टेटसवरील चित्रफिती हटविण्यात आल्या. याप्रकरणी ठाणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित सायबर गुन्हेगाराचा शोध सुरू असल्याचे मणेरा यांनी सांगितले.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
ठाणे पोलिस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप खात्याचा अनधिकृत ताबा घेतल्याचे निदर्शनास आले आहे. स्टेटसवर आक्षेपार्ह चित्रफिती प्रसारित होत असल्याने नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, तसेच त्या डाऊनलोड किंवा फॉरवर्ड करू नयेत. संशयास्पद लिंकपासून दूर राहावे. अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.