गौण खनिजाच्या अवैध उत्खननातून
१७.८९ कोटींचा महसूल बुडविला!
ठाणे तहसीलदारांचे १२ संस्था, व्यक्तींवर कारवाईचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : परवानगीविना गौण खनिजाचे उत्खनन, वाहतूक आणि अनधिकृत वापर करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल थकविणाऱ्या बांधकाम संस्था आणि व्यक्तींविरोधात फौजदारी कारवाई होणार आहे. वारंवार नोटिसा बजावूनही दंडाची रक्कम सरकारी तिजोरीत जमा न करणाऱ्या १२ बड्या संस्था आणि व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश ठाण्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी उमेश पाटील यांनी दिले आहेत. या प्रकरणांमध्ये तब्बल १७ कोटी ८९ लाख १५ हजार १० रुपयांचा दंड थकीत आहे. यासंदर्भात वाशी आणि पनवेल परिमंडळातील १४ पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना पत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
बेलापूर आणि नवी मुंबई परिसरात बांधकामांच्या ठिकाणी शासनाची परवानगी न घेता वाळू, माती आणि दगड यांसारख्या गौण खनिजांचे उत्खनन तसेच वापर करण्यात आल्याची प्रकरणे महसूल विभागाने उघडकीस आणली होती. या प्रकरणांमध्ये संबंधित संस्था आणि व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून वसुलीच्या नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या, मात्र वारंवार संधी देऊनही संबंधितांनी दंडाची रक्कम भरली नाही. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने आता केवळ दंड वसुलीपुरती कारवाई मर्यादित न ठेवता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने २३ जून २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि शासनाचा महसूल बुडविणाऱ्या संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
आरोपींविरोधात कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय संबंधितांपैकी कोणी सराईत गुन्हेगार असल्याचे आढळल्यास त्यांच्या विरोधात एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्तावही विचारात घेण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील गुन्हे दाखल करण्यासाठी बेलापूरचे मंडळ अधिकारी तसेच बेलापूर, शिरवणे, तुर्भे, घणसोली, ऐरोली आणि पावणे येथील तलाठ्यांना अधिकृत करण्यात आले आहे.
-------------------------
सर्वाधिक दंड सई प्रोजेक्टच्या नावावर
गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेल्या १२ संस्था आणि व्यक्तींच्या यादीत सई प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीच्या नावावर सर्वाधिक ८ कोटी ३० लाख २३ हजार १५२ रुपयांचा दंड थकीत आहे. त्याखालोखाल तिरुपती एंटरप्रायजेसच्या एका प्रकरणात ५ कोटी ८ लाख १९ हजार ७२ रुपयांची थकबाकी आहे. दोन स्वतंत्र प्रकरणांत तिरुपती एंटरप्रायजेसचे नाव असून एकूण थकबाकी ६ कोटी २१ लाख ३७ हजार ८४० रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.