सरकारी रुग्णालयांना मिळणार तारांकित मानांकन
स्वच्छता, औषधे, तपासणी आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचे मूल्यमापन;
रुग्णांच्या अनुभवावरून ठरणार सेवांचा दर्जा
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : सरकारी रुग्णालयांमधील आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आरोग्य विभागाकडून तारांकित मानांकन पद्धती राबविण्यावर भर दिला जात आहे. रुग्णांना प्रत्यक्षात मिळणाऱ्या सुविधा आणि उपचारांबाबतचा त्यांचा अनुभव याच्या आधारे रुग्णालयांचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यामुळे केवळ सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत, याऐवजी त्या किती प्रभावीपणे दिल्या जातात, हेही तपासले जाणार आहे.
या मूल्यांकनात प्रामुख्याने पाच बाबींचा समावेश असेल. त्यामध्ये रुग्णालयातील स्वच्छता, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे रुग्णांशी वर्तन, आवश्यक तपासण्यांची उपलब्धता, औषधांचा पुरवठा आणि उपचारांनंतर मिळणाऱ्या सेवेचा दर्जा यांचा समावेश आहे. रुग्णांकडून थेट अभिप्राय घेऊन आरोग्यसेवेचे मूल्यमापन केले जाणार आहे. रुग्णालयातील स्वच्छतेची छायाचित्रे मागविणे, तसेच विशेष पथकांमार्फत अचानक तपासणी करणे अशा उपाययोजनांचाही विचार केला जात आहे. त्यामुळे रुग्णालयांमधील प्रत्यक्ष परिस्थिती आणि नोंदींमधील माहिती यांची पडताळणी करणे शक्य होणार आहे.
प्रसूती आणि शस्त्रक्रियांच्या सेवांचाही या मूल्यांकनात महत्त्वाच्या निकषांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या सेवा यशस्वीपणे देण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, रक्तपेढी, रुग्णवाहिका, विद्युत जनित्र आणि अन्य आपत्कालीन सुविधांमध्ये समन्वय आवश्यक असतो. त्यामुळे प्रसूती आणि शस्त्रक्रियांच्या कामगिरीवरून रुग्णालयाची एकूण कार्यक्षमता तपासली जाणार आहे.
आरोग्य संस्थांचा दर्जा सुधारण्यासाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य मानके आणि राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानकांनुसार सुविधा विकसित करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि उपचार सुविधा यांची उपलब्धता व गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. या पद्धतीमुळे सरकारी रुग्णालयांमधील सेवांचे मूल्यमापन अधिक परिणामकारक होण्याची अपेक्षा आहे, मात्र मानांकनाबरोबरच आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी नियमित देखरेख आणि आवश्यक सुधारणा करणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
रुग्णांच्या समाधानाला प्राधान्य
रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णांना स्वच्छ परिसर, डॉक्टर आणि कर्मचारी वेळेवर उपलब्ध होणे, आवश्यक तपासण्या होणे आणि योग्य औषधे मिळणे या मूलभूत अपेक्षा असतात. यासोबतच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून रुग्णांशी कशा प्रकारे संवाद साधला जातो, याचाही विचार स्टार रेटिंगमध्ये केला जाणार आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून प्रत्यक्ष अभिप्राय घेतला जाणार असून, स्वच्छतेची छायाचित्रे मागवण्याबरोबरच विशेष पथकांकडून अचानक भेटी देऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यसेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.