अंबरनाथ, ता. १८ (वार्ताहर) : दिवस-रात्र जनतेच्या सुरक्षेसाठी धावपळ करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या निवासाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अंबरनाथमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सुमारे १०० कोटींच्या निधीतून तीन इमारतींचे गृहसंकुल उभारण्यात येणार आहे. १७ माळ्याच्या दोन आणि ११ माळ्याची एक अशा तीन इमारतींचे बांधकाम येथे होणार आहे. लवकरच या गृहसंकुलाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली.
अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम पोलिस ठाण्यांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना हक्काची निवासस्थाने मिळावीत, यासाठी आमदार किणीकर यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. तत्कालीन राज्यमंत्री रणजित देशमुख, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विविध बैठका घेऊन या प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तत्कालीन नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनीही या प्रक्रियेत सहभाग घेतला होता. या गृहसंकुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर पुढील दोन वर्षांत हक्काची निवासस्थाने उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे आमदार किणीकर यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर आज (ता. १८) आमदार किणीकर यांनी अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद यांची भेट घेऊन गृहसंकुलाच्या प्रकल्पाबाबत चर्चा करून प्रस्तावित जागेची पाहणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, बांधकाम सभापती शैलेश भाईर, नगरसेविका रोहिणी भोईर, संगीता गायकर, नगरसेवक संदीप तेलंगे, रोहित महाडिक, माजी नगरसेवक रवींद्र पाटील, शिवसेना पदाधिकारी किसन गायकर उपस्थित होते.
पोलिस ठाण्यालगतच हक्काची घरे
विशेष म्हणजे, पोलिसांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणापासून जवळच घर उपलब्ध व्हावे, यासाठी अंबरनाथ पोलिस ठाण्यालगतच्या जागेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ड्युटी संपल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत घरी पोहोचणे पोलिसांना शक्य होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचण्यासोबतच कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधीही मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.