उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : अंगणवाडीतील बालकांना गरम आणि ताजा पोषण आहार पुरविण्याच्या माध्यमातून उल्हासनगरातील सुमारे ४५ महिला बचत गटांना रोजगार मिळत आहे. मात्र, राज्य सरकारची प्रस्तावित सेंट्रल किचन योजना शहरात लागू झाल्यास आहार पुरवठ्याचे काम मोठ्या संस्थाकडे जाण्याची भीती महिलांमध्ये आहे. शहरातील २१७ अंगणवाड्यांमधील सुमारे पाच हजार बालकांच्या आहार पुरवठ्याची जबाबदारी स्थानिक महिला गटांकडेच कायम ठेवावी, अशी मागणी करत बचत गटांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविण्यासाठी सेंट्रल किचन योजना राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे उल्हासनगरसह आसपासच्या शहरांतील महिला बचत गटांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सध्या शहरातील २१७ अंगणवाड्यांमधील सुमारे पाच हजार बालकांना जवळपास ४५ महिला बचत गट आणि महिला मंडळे दररोज गरम व ताजा पोषण आहार पुरवतात. या कामातून शेकडो महिलांना रोजगार मिळत असून, अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहही त्यावर अवलंबून आहे.
नंदुरबारमध्ये ‘फीडिंग इंडिया’च्या माध्यमातून सेंट्रल किचनद्वारे हजारो बालकांना दिवसातून दोन वेळा आहार दिला जातो. या उपक्रमाचा राज्यभर विस्तार करण्याचा सरकारचा विचार असल्याने स्थानिक बचत गटांनी रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. उल्हासनगरात ही योजना लागू झाल्यास आहार तयार करण्याचे आणि पुरविण्याचे काम मोठ्या संस्थांकडे जाऊ शकते, अशी भीती गटांनी व्यक्त केली आहे. या कामातून महिलांना स्वतःचे उत्पन्न मिळते आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळतो, असे बचत गटांचे म्हणणे आहे. त्यामुळे योजना लागू करू नये आणि आहार पुरवठ्याचे काम स्थानिक गटांकडेच कायम ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी आंदोलनाचाही इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.