नवीन पनवेलमध्ये वृद्धाला १३ लाखांचा गंडा
पनवेल, ता. २८ (खारघर) : सायबर भामट्यांनी नवीन पनवेल येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त वृद्धाला अटक करण्याची भीती दाखवून आठ दिवस घरामध्ये नजरकैदेत ठेवले. तसेच त्यांच्याकडून १३ लाख रुपये उकळले. वृद्धाच्या पत्नीला फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी खांदेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातील अनोळखी सायबर टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१३ ऑगस्टला एका भामट्याने भारतीय डेटा सेंटरचा पोलिस अधिकारी रोहित कुमार असल्याचे भासवून संपर्क साधला. तसेच त्यांच्या नावाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या संघटनेने एका बँकेत बनावट खाते उघडले असून त्यांच्या नावावरील सिम कार्डचा गुन्ह्यात गैरवापर झाल्याचे सांगत त्यांना अटकेची भीती दाखवली. तसेच एका खोलीत स्वतःला बंदिस्त करून घेण्यास भाग पाडले. आरोपींनी वृद्धाला १३ ते २० ऑगस्टदरम्यान नजरकैदेत ठेवले. त्यानंतर १९ ऑगस्टला एकूण १३ लाख रुपये एका बँकेत वर्ग करण्यास भाग पाडले. २० ऑगस्टला पुन्हा व्हिडिओ कॉल करून या वृद्धाला आणि त्यांच्या पत्नीला समोरासमोर बसवून घरातील सोने आणि इतर बँक खात्यांमधील रकमेची माहिती मागण्यास सुरुवात केली. त्या वेळी वृद्धाच्या पत्नीला फसवणूक होत असल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.