जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी
धारदार शस्त्रे, रॉड आणि दगडांचा वापर; सहा जणांना बेड्या
नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : पूर्वी झालेल्या भांडणाचा वाद मिटवण्यासाठी आयोजित केलेली बैठकच हिंसक ठरल्याची घटना ऐरोलीतील चिंचपाडा परिसरात घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेत दोन्ही गटांतील तरुणांनी बांबू, धारदार शस्त्रे, स्टील रॉड आणि दगडांचा वापर करीत एकमेकांवर प्राणघातक हल्ला चढवला. या संघर्षात तिघे जण गंभीर जखमी झाले असून, रबाळे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करीत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
तक्रारदार शिवकुमार नार (२५) याचा भाऊ शिवराज नार आणि आरोपी सुभान रेहमानी यांच्यात दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. हा वाद पुढे वाढू नये, या उद्देशाने रविवारी (ता. ३०) चिंचपाडा येथील शंकर मंदिरासमोर दोन्ही गटांची बैठक बोलावली होती. चर्चा सुरू असताना दोन्ही गटांच्या तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि काही वेळातच त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. ही मारामारी सोडवण्यासाठी शिवकुमार नार, शिवराज नार आणि सुनील नार हे मध्यस्थी करण्यास गेले असता, आरोपींनी त्यांच्यावरही बांबू, लोखंडी रॉड, धारदार हत्यारे आणि दगडांनी जीवघेणा हल्ला चढवून त्यांना जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील बेकायदा जमाव जमवून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शमसुद्दीन रजिउद्दीन रेहमानी ऊर्फ इम्रान, सुभान रजिउद्दीन रेहमानी, मोहम्मद हबीब मोहमद सईद शेख, अश्फाक रफिक मन्सुरी ऊर्फ खान, सिराजुद्दीन शब्बीर रेहमानी ऊर्फ खान, शाहबुद्दीन कलामुद्दीन खान ऊर्फ शाबू शेख या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणि शांततापूर्ण आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.