रबाळे येथील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात ट्रक क्लीनरला सात वर्षांचा सश्रम कारावास
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : रबाळे येथे घडलेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना डिसेंबर २०१६ मध्ये घडली होती. या प्रकरणातील आरोपी क्लीनरला बेलापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून सात वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि नऊ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
सुनील आरवे ट्रकवर क्लीनर म्हणून काम करीत होता. १४ डिसेंबर २०१६ला रात्रीच्या सुमारास रबाळे येथील शिवाजी फ्लोअर मिलसमोर धान्याने भरलेला ट्रक तो मागे घेत होता. त्या वेळी त्याने रस्त्याकडेला स्कुटीवरून जात असलेल्या दाम्पत्याला धडक दिली. या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या तिघा तरुणांनी आरोपीला ट्रक थांबविण्यासाठी आवाज दिला; मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करत ट्रक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी अमित कदम व ज्ञानेश्वर देवकर या दोघांनी ट्रकचालक व क्लीनर बाजूच्या दरवाजाजवळ पकडून ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. हे दोघे ट्रकला लटकलेल्या अवस्थेत असल्याचे आरोपीला माहीत असतानाही त्याने ट्रक न थांबवता भरधाव नेला. त्यानंतर त्याने रबाळे तलावासमोर एका ट्रॅव्हल्स बसला मागून धडक दिली. या अपघातात ट्रकच्या डाव्या बाजूला लटकलेला अमित कदम याचा मृत्यू झाला, तर ज्ञानेश्वर देवकर हा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी सुनील सोमला याला पकडले होते. त्या वेळी आरोपीकडे केवळ हलके मोटार वाहन चालविण्याचा परवाना असतानाही अवजड वाहन चालविल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी आरोपीविरोधात सदोष मनुष्यवधासह मोटार वाहन काद्यानुसार बेलापूर येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.